खडसेंबाबत चंद्रकांत पाटील म्हणतात 'रात गई बात गई'  - Chandrakant Patil says about Eknath Khadse "Raat Gayi Baat Gayi" | Politics Marathi News - Sarkarnama

खडसेंबाबत चंद्रकांत पाटील म्हणतात 'रात गई बात गई' 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

भाजपकडून पुणे पदवीधर मतदार संघासाठी संग्राम देशमुख तर, शिक्षक मतदार संघासाठी जितेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सातारा : आमच्या संपर्कात भारतीय जनता पक्षाचे दहा ते बारा आमदार आहेत, असा दावा माजी मंत्री एकनाथ खडसे करत आहेत. त्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आले, त्या वेळी "तो विषय आमच्यासाठी संपला आहे. रात गई बात गई' असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी प्रश्‍नाला बगल दिली. 

भाजपकडून पुणे पदवीधर मतदार संघासाठी संग्राम देशमुख तर, शिक्षक मतदार संघासाठी जितेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ साताऱ्यात आज (ता. 13 नोव्हेंबर) कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी खडसेंबाबत वरील विधान केले. 

भाजप सरकारच्या कालावधीत पदवीधर बेरोजगारांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने कर्ज वाटप, औद्योगिक वसाहत उभी करण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच कायम विनाअनुदानित शाळांच्या समोरील कायम हा शब्द काढून टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याची प्रक्रिया राबविली.

प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केली. शिक्षण संस्थांना 20 टक्के अनुदान मंजूर केली. त्यामुळे पदवीधर व शिक्षक दोन्ही पक्षाच्या बाजूने राहतील. पुणे पदवीधर मतदार संघासाठी संग्राम देशमुख तर, शिक्षक मतदार संघासाठी जितेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्ही उमेदवारांना निवडून आणावे, असे आवाहन पाटील यांनी केले. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देऊ, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, दिवाळी आली तरी शेतकऱ्यांना एक पै मिळालेले नाही. पैसे नसल्याने आता शेतकऱ्यांना दिवाळीचा सण साजरा करता येत नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या शेतकरी किसान आघाडीतर्फे संपूर्ण राज्यात झुणका भाकर खाण्याचे आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध करण्यात येत आहे. ही आंदोलनेही दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे राज्यात लोकशाही आहे काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

महाविकास आघाडीची दडपशाही, अनागोंदी व खोट्या आश्‍वासनांना राज्यातील जनता वैतागली आहे. ती मतदानाची वाट पहात दबा धरून बसली आहे. विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीतील सर्वच्या सर्व जागांसाठी भारतीय जनता पक्षाला मतदान करून आम्ही नाराज असल्याचा संदेश जनता राज्यकर्त्यांना देईल. त्यामुळे या निवडणुकांचा राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार असल्याचे भाकितही चंद्रकात पाटील यांनी या वेळी केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख