भाजप आमदार परिचारकांनी केली अजित पवारांकडे ही मागणी  - BJP MLA Prashant Paricharak this demand to Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप आमदार परिचारकांनी केली अजित पवारांकडे ही मागणी 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंढरपूर दौऱ्यावर आलेले असताना आमदार प्रशांत परिचारक यांनी त्यांना या संदर्भात सविस्तर निवेदन देऊन चर्चा केली.

पंढरपूर : सोलापूर जिल्हा व परिसर ओला दुष्काळ म्हणून जाहीर करून लवकरात लवकर नागरिकांना, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंढरपूर दौऱ्यावर आलेले असताना आमदार प्रशांत परिचारक यांनी त्यांना या संदर्भात सविस्तर निवेदन देऊन चर्चा केली. 

आमदार परिचारक यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे, की जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपुर्ण जिल्ह्यातील नद्या, नाले तुडूंब भरून वाहत होते. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यात 190 मिलिमीटरपर्यंत पावसाचे नोंद झाली आहे.

यामध्ये नदीकाठची हजारो एकर पिके पाण्याखाली गेली. शेताच्या जमिनी खचल्या, चारा व धान्य पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याने, घरांचे नुकसान झाले. त्यामुळे नागरिकांचे व शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. 

जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीची झालेली व्याप्ती पाहता ओला दुष्काळ जाहीर करून मदत देण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 

सोलापूर जिल्हातील झालेल्या अतिवृष्टीमुळे व भीमा नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पुराचा फटका बसला आहे. यामध्ये शेतकऱ्यांची द्राक्ष, ऊस, डाळिंब, केळी, कांदा आदी पिकांना या पावसाच्या व पुराच्या पाण्यामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसानास सामोरे जावे लागले. यासर्व संकटांमुळे शेतकन्यांचे आर्थिक नुकसान फार मोठ्या प्रमाणात झाले, असे परिचारक यांनी पत्रात नमूद केले आहे. 

पंढरपूर शहरातील भीमा नदीकाठच्या नागरिकांच्या घरात, वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने घरातील सामानाची, जीवनावश्‍यक वस्तूंची, घरांची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नागरिकांचे घरे चिखलमय झाल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून जिल्हा व परिसर ओला दुष्काळ म्हणून जाहीर करून लवकरात लवकर नागरिकांना, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई, देण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली आहे. 

हेही वाचा : सर्वपक्षीय आमदारांनो, शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी एकत्र येऊया 

चिपळूण : कोकणातील बळिराजा कठिण व अस्मानी संकटात पुरता उद्‌ध्वस्त झाला आहे. त्याच्या पाठिशी आपण सर्वच लोकप्रतिनिधींनी उभे राहिले पाहिजे. ही वेळ सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची आहे. कोकणातील शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊया, असे आवाहन गुहागरचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी कोकणातील सर्वपक्षीय आमदारांना केले आहे. 

माजी मंत्री जाधव म्हणाले की, प्रचंड प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी वर्ग कधी नव्हे इतका मोठ्या संकटात सापडला आहे. अतिवृष्टीने उभी पिके, कापून ठेवलेली पिके, कापून शेतामध्ये साठवून ठेवलेली पिकेसुध्दा डोळ्यादेखत वाहून जात असल्याचे शेतकऱ्यांना पाहावे लागले आहे. याची तातडीने दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख