विश्‍वजित कदमांचा पारा चढला; म्हणाले 'आम्ही लंडनला जाऊन झोपा काढत नाही' 

मित्रपक्ष (राष्ट्रवादी) कॉंग्रेसला खिंडारपाडत आहे; म्हणून कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रडत बसू नये.
Vishwajit Kadam angrey on Congress office bearers
Vishwajit Kadam angrey on Congress office bearers

सांगली : मित्रपक्ष (राष्ट्रवादी) कॉंग्रेसला खिंडार  पाडत आहे; म्हणून कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रडत बसू नये. आम्ही नेतेमंडळी झोपा काढत नाही, पक्षवाढीसाठी काम करतो, पण तुम्ही काय करता? पदाधिकारी व तालुकाध्यक्षांनी कोरोनाच्या काळात किती काम केले?

पक्षवाढीसाठी नेत्यांबरोबर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ताकद हवी असते. आता झाले गेले विसरून जाऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न करणे आवश्‍य आहे. आम्ही सर्व नेते एकत्रित तालुकानिहाय दौरा सुरू करणार असून पदाधिकाऱ्यांनीही सक्रीय व्हावे,' असे खडे बोल कॉंग्रेसचे युवा नेते, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले. 

कॉंग्रेसच्या ग्रामीण व शहरातील पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक विश्वजीत कदम यांनी शनिवारी कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयात घेतली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, कॉंग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शैलजाभाभी पाटील, युवा नेते जितेश कदम, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, एनएसयूआयचे सौरभ पाटील आदी उपस्थित होते. 

आटपाडी, खानापूर, पलूस तालुक्‍यातील पदाधिकाऱ्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली. कॉंग्रेसचे नेते पाहणी दौरे करतात; पण कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नाहीत, उलट इतर पक्षाचे लोक त्यांच्याबरोबर असतात. अशी खंत अनेकांनी व्यक्त केली. यावर कदम यांचा पारा चढला. 

ते म्हणाले, "मित्रपक्ष कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर गळ टाकून पक्षप्रवेश देत आहे. मात्र गेलेले जाऊदेत ते आपले तर होते का? याचा विचार केला पाहिजे आणि कोण काय करत याकडे लक्ष देण्याची ही वेळ नाही. पक्षातील मंडळी दुसऱ्या पक्षात जातात म्हणून रडत बसायचे नाही. सांगली जिल्हा कॉंग्रेसचा मोठा इतिहास आहे. पक्षसाठी आता संघर्ष आवश्‍यक आहे. नेत्यांबरोबर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील पक्षवाढीसाठी सक्रीय होणे आवश्‍यक आहे.'' 

कोरोनाच्या काळात एकाही पदाधिकाऱ्याने तालुकास्तरावर मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले नाही. नेते येत नाहीत राहू दे; पण तालुकास्तरावर किती आढावा बैठका तालुकाध्यक्षांनी घेतल्या? आणि आम्ही नेतेमंडळी काय लंडनला जाऊन झोपा काढत नाही. कोरोना काळात राज्यात व जिल्ह्यात किती काम केले? हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे दुसरा पक्ष काय करतो, याची चर्चा करून रडत बसण्यापेक्षा आपण पक्षवाढीसाठी काय करायला पाहिजे, याकडे लक्ष द्यावे. यापुढे बैठकीत बोलताना नैतिकता सांभाळावी, असे खडेबोल कदम यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले. 

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येणार आहेत. त्यामुळे प्रथम सांगली जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविणे आवश्‍यक आहे. त्यासाठी योग्य पावले आम्ही टाकू. मात्र पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ऍक्‍टिव्ह व्हावे. पक्ष टिकला तरच आपण टिकणार आहोत. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील सर्व नेते तालुकानिहाय एकत्रित दौरा करणार आहेत. या दौऱ्यात अधिकाऱ्यांना देखील बोलाविले जाईल. शेतकरी कामगार व इतर वर्गाचे सर्व प्रश्न त्यावेळी मार्गी लावू, अशी ग्वाही कदम यांनी दिली. 

विशाल पाटील म्हणाले, राज्यात विकास महाआघाडीचे सरकार आहे. अतिवृष्टीच्या काळात शेतकऱ्यांना हे सरकार मदत करणार आहे. त्यामुळे सरकार जी मदत करणार आहे, ती मदत शेतकऱ्यांना कॉंग्रेसमुळे मिळाली आहे, हे सर्वांसमोर मांडणे आवश्‍यक आहे. कॉंग्रेसची एकहाती सत्ता येण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. 

जयश्रीताई पाटील म्हणाल्या, कॉंग्रेस पक्षात गट-तट नाहीत. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील गट-तट करत बसू नये. पक्षवाढीसाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. सध्यपरिस्थितीला शेतकऱ्यांना कशा प्रकारे जास्तीत जास्त मदत होईल, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. शिवाय जिल्ह्यात लवकरच सर्व नेते एकत्रित तालुकानिहाय बैठक घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

पृथ्वीराज पाटील म्हणाले, सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. शिवाय महापालिकेत देखील भाजपची सत्ता आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात पक्षवाढीसाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी नगरसेवक व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संघटीत होऊन काम करावे. 

पदाधिकारी व नगरसेवकांनी कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी यापुढे एकदिलाने काम करू अशी ग्वाही दिली. ग्रामीणच्या बैठकीला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मालन मोहिते, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील, सुभाष खोत, नामदेवराव मोहिते, अमित पाटील यांच्यासह तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तर शहर बैठकीला विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक मनोज सरगर, संजय मेंढे, अमर निंबाळकर, विशाल कलगुटगी, दिलीप पाटील, प्रमोद सुर्यवंशी आदी उपस्थित होते. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com