जिल्हा बॅंक कोणत्याही परिस्थितीत भाजपच्या हाती लागू देणार नाही 

जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सहकारातील वातावरण अधिकच ढवळले.
Sindhudurg District Co-operative Bank will not be taken over to BJP : Atul Ravrane
Sindhudurg District Co-operative Bank will not be taken over to BJP : Atul Ravrane

देवगड : सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बॅंकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे नेते अतुल रावराणे यांनी आज (ता. 25 फेब्रुवारी) जामसंडे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांची भेट घेतली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा बॅंक निवडणूक लढवली जाणार असल्याने ही भेट घेतल्याचे रावराणे यांनी सांगितले. 

भाजपने सहकार पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा कोणताही आटापिटा केला, तरी जिल्हा बॅंक त्यांच्या हाती लागू देणार नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणामधील आगामी काळातील महत्वाचा टप्पा मानला जाणारी जिल्हा बॅंक निवडणूक येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सहकारातील वातावरण अधिकच ढवळले. त्यातच आगामी निवडणूक जिंकण्यासाठी मोठी कसोटी लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर आतापासून नेत्यांच्या गाठीभेटी, चर्चा तसेच व्यूहरचना सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. 

याचाच एक भाग म्हणून येथील देवगड तालुका दौऱ्यावर आलेले शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख निनाद देशपांडे उपस्थित होते. 

घाटे यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना रावराणे म्हणाले, सहकारामध्ये राजकारण असू नये. सर्वसामान्यांची बॅंक म्हणून सामान्य माणसाला जिल्हा सहकारी बॅंकेबद्दल जिव्हाळा, आपुलकी वाटली पाहिजे. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडी करूनच जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. यासाठी देवगड तालुक्‍यातील सहकारामधील जाणकार असलेले घाटे यांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले. 

भाजपचा जिल्हा बॅंक जिंकण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडला जाईल. महाविकास आघाडी घट्ट असून विजय आपलाच असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्‍त केला. 

देवगड तालुक्‍यातील विविध विकास कामांबद्दलही अतुल रावराणे यांनी नंदकुमार घाटे यांच्याशी चर्चा केली. जनतेच्या प्रलंबित प्रश्‍नाची सोडवणूक होण्यासाठी आवश्‍यक विकास निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे रावराणे यांनी या वेळी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com