शेतकऱ्यांना कर्ज न देणारी सांगली बॅंक संजयकाका पाटलांवर मेहेरबान  - Sangli District Bank is preparing to give loan to Sanjaykaka Patil | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांना कर्ज न देणारी सांगली बॅंक संजयकाका पाटलांवर मेहेरबान 

संपत मोरे 
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज देत नाही, कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनीही कर्ज देत नाही, मात्र, तीच बॅंक थकबाकीदार असलेल्या खासदार संजयकाका पाटील यांच्यावर मात्र मेहेरबान झाली आहे. त्यांच्या साखर कारखान्यासाठी 30 कोटींचे कर्ज वाटप करण्याच्या तयारीत आहे.

पुणे : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज देत नाही, कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनीही कर्ज देत नाही, मात्र, तीच बॅंक थकबाकीदार असलेल्या खासदार संजयकाका पाटील यांच्यावर मात्र मेहेरबान झाली आहे. त्यांच्या साखर कारखान्यासाठी 30 कोटींचे कर्ज वाटप करण्याच्या तयारीत आहे. शेतकऱ्यांना एक न्याय आणि खासदारांना वेगळा न्याय का?' असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केला आहे. 

दरम्यान, "कर्ज नाकारलेल्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही सांगली जिल्हा बॅंकेवर मोर्चा काढणार आहोत,' असा इशारा खराडे यांनी दिला आहे. 

खराडे म्हणाले,"संजयकाका पाटील यांच्या पलूस येथील दिव्हा इन्‌ फूड या कंपनीचे 36 कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. या कंपनीचा जिल्हा बॅंकेने लिलावही काढला आहे. म्हणजेच संजयकाका हे थकबाकीदार आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर तासगाव सहकारी साखर कारखान्यासाठी ही जिल्हा बॅंकेने 100 ते 125 कोटीचा कर्ज पुरवठा केला होता ते कर्ज ही थकीत असल्यानेच कारखाना बंद पडला. राज्य बॅंकेने त्याची विक्री 34 कोटी रुपयांना केली, हे वास्तव आहे. पुन्हा त्याच कारखान्यासाठी जिल्हा बॅंक 30 कोटींचा कर्ज पुरवठा करणार आहे. 

जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील आणि कार्यकारी अधिकारी जयवंत कडू पाटील हे दोघेही खमके आहेत, तरीही नियम धाब्यावर बसवून कसा काय कर्ज पुरवठा करण्यात येतो आहे, हा खरा प्रश्न आहे,' असे खराडे म्हणाले. 

"सारे संचालक मंडळ काय करते आहे? संजयकाका यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी विशाल पाटील हे ही संचालक आहेत. बॅंक शेतकऱ्याची आहे की कारखानदारांची? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जात नाही आणि कारखानदारांना कोट्यवधीच्या कर्जाची खिरापत वाटण्याचा गोरखधंदा बॅंकेत सुरू आहे. जिल्हा बॅंकेत जिल्ह्यातील बड्या नेत्यांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज असताना पुन्हा बड्या नेत्यांना कर्जे देण्याचा घाट घातला जातो आहे, हे कशासाठी, असा प्रश्‍न महेश खराडे यांनी उपस्थित केला आहे. 

"बॅंक शेतकऱ्यांची असताना शेतकऱ्यांना कर्जे नाकारली जात आहेत. जे शेतकरी कर्जमाफीत बसले आहेत. त्याच्या नावावर कोणतेही कर्ज नाही, अशा शेतकऱ्यांचे सीबिल खराब आहे; म्हणून त्यांना कर्ज दिले जात नाही. शेतकऱ्याच्यासाठी कडक नियमावली आणि संजयकाकांना पायघड्या घातल्या जात असतील तर हे चालू दिले जाणार नाही, या मनमानी विरोधात बॅंकेवर मोर्चा काढण्यात येईल,' असा इशारा खराडे यांनी दिला आहे. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख