समरजितसिंह घाटगेंची सत्तारुढ गटात इंट्री होताच मुश्रीफांनी नकार कळविला  - Samarjit Singh Ghatge's entry into the ruling party in Gokul's election; So Mushrif took the exit | Politics Marathi News - Sarkarnama

समरजितसिंह घाटगेंची सत्तारुढ गटात इंट्री होताच मुश्रीफांनी नकार कळविला 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 19 मार्च 2021

मुरगुड नगरपालिकेच्या निवडणुकीत मुश्रीफ यांनी खासदार प्रा. संजय मंडलिक यांना साथ दिली.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सत्तारूढ गटासोबत जाण्यात कागल तालुक्‍यातील ज्येष्ठ संचालक रणजितसिंह पाटील व अंबरिष घाटगे यांची उमेदवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी अडचणीची ठरत आहे. त्यातच मुश्रीफ यांच्या विरोधात विधानसभेसाठी शड्डू ठोकलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनीही सत्तारूढ गटासोबतच जाण्याचा निर्णय घेताच मुश्रीफ यांनी सत्तारूढ गटाला नकार कळविला आहे. 

पाच वर्षांपूर्वी झालेल्या 'गोकुळ' च्या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी सत्तारूढ गटाला पाठिंबा दिला होता. यामागे विधानसभेचे राजकारण होते. विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत रणजितिसिंह पाटील यांनी मुश्रीफ यांना साथ दिली होती. त्याची परतफेड म्हणून मुश्रीफ सत्तारूढ गटासोबत राहिले. पण त्यानंतर झालेल्या मुरगुड नगरपालिकेच्या निवडणुकीत मुश्रीफ यांनी खासदार प्रा. संजय मंडलिक यांना साथ दिली.

त्यातून रणजितसिंह पाटील यांचे नगरपालिकेवरील वर्चस्व संपुष्टात आले. त्यामुळे पाटील यांनी मुश्रीफ यांची साथ सोडून भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर त्यांचे बंधू व मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह हे मुश्रीफ यांच्यासोबत राहिले. 

कागलच्या राजकारणात मुश्रीफ विरुद्ध संजय घाटगे असाच सामना राहीला. त्यातूनच "गोकुळ' च्या गेल्यावेळच्या निवडणुकीत घाटगे यांचे पुत्र अंबरिश त्यावेळच्या विरोधी आघाडीत गेले आणि निवडूनही आले. पण, आता त्यांनी सत्तारूढ गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

अलिकडेच झालेल्या एका कार्यक्रम संजयबाबा व त्यांचे पुत्र अंबरिश यांनी मुश्रीफ यांच्या मागे राहण्याचा निर्णय जाहीर केला. पण आता त्यांनी घेतलेली भूमिका मुश्रीफ यांना रुचलेली नाही, त्यामुळेच आमदार पी. एन. पाटील यांच्यासोबतच्या चर्चेत त्यांनी या दोन मुद्यावरच आपण सत्तारूढ गटासोबत जायचे कसे? असा प्रश्‍न उपस्थित केल्याचे समजते. 

मुश्रीफ यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना साथ देण्याचे ठरविल्यास त्यांच्याकडून त्यांचे पुत्र नाविद, प्रा. मंडलिक यांचे पुत्र विरेंद्र यांची विरोधी आघाडीतील उमेदवारी निश्‍चित समजली जाते. आयत्यावेळी रणजितसिंह यांना विरोध म्हणून त्यांचे बंधू प्रविणसिंह यांनाही रिंगणात उतरण्याची चाल खेळली जाण्याची शक्‍यता आहे. 

घाटगे-पाटील यांची भूमिका महत्त्वाची 

कागल तालुक्‍यात "गोकुळ' चे 383 मतदार आहेत. त्यात रणजितसिंह पाटील व अंबरिष घाटगे या दोघांकडे मिळून किमान 200 ते 225 मतदार आहेत. शाहू ग्रुपचे घाटगे यांच्याकडे स्वतःचे असे जवळपास 45 मतदार आहेत. यावरून सद्यस्थितीत या तालुक्‍यात घाटगे गटच वरचढ असल्याचे दिसून येते. "गोकुळ' च्या राजकारणात मुश्रीफ यांच्या विधानसभा किंवा मंत्रिपदावर आजपर्यंत तरी परिणाम झाल्याचे दिसत नाही, पण भविष्यातील दोन घाटगे आणि रणजितिसिंह पाटील यांची भूमिका महत्त्वाची असेल. 

दीड लाख लिटर दूध संकलन 

कागल तालुक्‍यातून दररोज सुमारे दीड लाख दूध संकलन आहे. तालुक्‍यातील काही गांवे बिद्रीला तर काही गांवे गडहिंग्लज येथील चिलिंग सेंटरला संलग्न आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख