राष्ट्रवादी कॉंग्रेस नसती तर मंत्री झालो नसतो : हसन मुश्रीफांची कबुली  - Had it not been for the NCP, I would not have become a minister: Hasan Mushrif | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादी कॉंग्रेस नसती तर मंत्री झालो नसतो : हसन मुश्रीफांची कबुली 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

चंद्रकांत पाटील यांनी एकदा माफी मागून हा विषय संपवणे आवश्‍यक असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपणास भरभरून दिले आहे. त्यांनी मला 16 वर्षे मंत्री केले, जर राष्ट्रवादी कॉंग्रेस नसती, तर आपण कधीच मंत्री झाला नसतो, अशी प्रांजळ कबुली राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. राष्ट्रवादीशिवाय आपण इतर कोणत्याच पक्षाचा विचार करत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील विजयानंतर मंत्री मुश्रीफ हे कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा एक चेहरा हा दुसऱ्याला मदत केल्याचा, परोपकार केल्याचे दाखवण्याचा आहे. दुसरा चेहरा हा काटा काढण्याचा आहे. सत्ता आल्यानंतर चंद्रकांतदादांनी मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. भाजपत येण्याची त्यांनी ऑफर दिली होती. मात्र, मी ती स्पष्टपणे नाकारली होती. त्यामुळे सूड भावनेतून कारवाई केल्याचा आरोपही मुश्रीफ यांनी केला. 

जिल्ह्यातील कोणत्याही आमदारांनी राजीनामा द्यावा, त्या जागेवर निवडून आलो नाहीतर हिमालयात जाईन, असे वक्‍तव्य आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले होते. मात्र, जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही. त्यामुळे कोणी राजीनामा देण्याचा काहीच प्रश्‍न नव्हता. मात्र चंद्रकांत पाटील यांनी ज्या पदवीधर मतदार संघाचे 12 वर्षे प्रतिनिधीत्व केले आहे, त्या मतदार संघात भाजपचे उमेदवार थोड्याथोडक्‍या नव्हे तर 50 हजार मतांनी हारले आहेत. पहिल्याच फेरीत त्यांचा दणदणीत पराभव झाला. त्यामुळे या मतदारसंघाचे प्रतनिधीत्व केलेल्या चंद्रकांतदादांनी आता पुढे काय करायचे ते ठरवावे, असा चिमटा मुश्रीफ यांनी काढला. तसेच, किमान आता तरी झालेल्या चुकांबद्दल माफी मागावी, असे आवाहन केले. 

मुश्रीफ म्हणाले, पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील विजय आम्ही विनयाने घेतो. सत्ता आल्यानंतर काटा काढणे, विरोधकांच्या घरावर छापे घालणे असा प्रकार योग्य नाही. आमची आता सत्ता आहे म्हणून आम्ही सूड भावनेने वागत नाही. अशी भूमिका घेतली तर लोक बरोबर जागा दाखवतात हे या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. भाजपची सत्ता आल्यानंतर चंद्रकांतदादांनी मला राजकीय व सामाजिक जिवनातून उठवण्याचा प्रयत्न केला.

निवडणुकीच्या अगोदर महिनाभर धाड टाकण्यामागे मोठा अर्थ आहे. निवडणुकीत रसद मिळू नये म्हणून कागल, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथील निवासस्थानावर धाडी टाकल्या. बॅंकेवर प्रशासक आणले, कलम 88 नुसार चौकशी लावली, राज्य बॅंकेवर कारवाई केली. केवळ व्यक्‍तीगत द्वेषातून चंद्रकांत पाटील यांनी ही कारवाई केली. त्यामुळे माझा संताप आहे. याबाबत त्यांनी एकदा माफी मागून हा विषय संपवणे आवश्‍यक असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 

महापालिकेबाबत मुश्रीफ ठाम 
महापालिका निवडणुकीत ज्या ठिकाणी शक्‍य आहे, त्या ठिकाणी तिन्ही पक्ष एकत्र येतील. ज्या ठिकाणी आमची ताकत जास्त आहे, तिथे दुसऱ्याचा फायदा होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्यासाठी श्रेष्ठींना पटवून देवू, असे सांगत महापालिका निवडणुकीतील भूमिका मुश्रीफ यांनी स्पष्ट केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख