राज्यपाल कोश्‍यारींबाबत शंभूराज देसाई 'प्रचंड आशावादी'  - Governor will think positively about the names sent for the Legislative Council: Shambhuraj Desai | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यपाल कोश्‍यारींबाबत शंभूराज देसाई 'प्रचंड आशावादी' 

संदीप खांडेकर 
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

शिवसेना दिलेली जबाबदारी निष्ठापूर्वक पार पाडेल. उमेदवारांच्या विजयात शिवसेनेचा मोठा वाटा असेल.

कोल्हापूर : "राज्य सरकारने विधान परिषदेसाठी नामनिर्देशित केलेल्या बारा जागांवरील नावांना राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी घेतलेल्या आक्षेपांची माहिती अधिकृत नाही. घटनेतील तरतुदीनुसार मंत्रिमंडळाने ही नावे राज्यपालांकडे पाठवली आहेत. त्याबाबत ते सकारात्मक विचार नक्कीच करतील,' असा आशावाद राज्याचे गृहराज्यमंत्री शूंभराज देसाई यांनी व्यक्त केला. 

"विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शंभूराज देसाई हे कोल्हापुरात आले होते. त्या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

देसाई म्हणाले, "विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीकरिता कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षाची प्रचार यंत्रणा कार्यरत आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर आमचा भर आहे. तीनही पक्षांत चांगला समन्वय असून, शिवसेना दिलेली जबाबदारी निष्ठापूर्वक पार पाडेल. उमेदवारांच्या विजयात शिवसेनेचा मोठा वाटा असेल.

कोरोनाच्या संचारबंदीत उद्योग-व्यवसाय बंद राहिले. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत म्हणावे तसे उत्पन्न जमा झाले नाही. आर्थिक स्थिती जशी पूर्वपदावर येत राहील, तसा समतोल राखून सर्व विभागांना न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे. ज्या विभागांची निकड आहे, त्यांना सध्या निधी दिला जात आहे. तसा निर्णय मंत्रिमंडळ घेत आहे. ऊर्जा खाते तोट्यात चालले आहे. या खात्याचाही सहानुभूतीपूर्वक विचार करत आहोत.' 

"जिल्ह्यातील स्थिती पाहून व पालकांची संमती घेऊन स्थानिक प्रशासनाला शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात आहे,' असे शंभूराज देसाई म्हणाले. 

पत्रकार परिषदेस खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार सुरेश साळोखे, विजय देवणे, मुरलीधर जाधव उपस्थित होते. 

फडणवीस आघाडीत मतभेद निर्माण करीत आहेत 

देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असल्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही. त्यामुळेच ते आघाडीमध्ये मतभेद निर्माण करण्याचे वक्तव्य करत आहेत, असा टोला देसाई यांनी लगावला. 

सरकारची तयारी 
दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता गृहित धरून कोविड सेंटर कायमस्वरूपी बंद केलेले नाहीत. पुरेसा ऑक्‍सिजन साठा उपलब्ध केला आहे. कोरोनाला सामोरे जाण्याची तयारी सरकारने ठेवली असून औषधांचा साठाही केला आहे, असे गृहराज्यमंत्री देसाई यांनी दिली. 

दिशा कायदा अंतिम टप्प्यात 
महिलांवरील अत्याचाराला रोखण्यासाठी दिशा कायदा अंतिम टप्प्यात आला आहे. त्याविषयी चार ते पाच बैठका झाल्या आहेत. त्याकरिता नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या समितीने त्याचे प्रारूप तयार केले आहे. एक-दोन बैठकांनंतर त्याला मान्यता दिली जाईल, असे गृहराज्यमंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख