सकाळी लग्नबंधनात अडकलेली नववधू सायंकाळी निघाली कोरोनाबाधित - The evening report of the girl who got married in the morning came corona positive | Politics Marathi News - Sarkarnama

सकाळी लग्नबंधनात अडकलेली नववधू सायंकाळी निघाली कोरोनाबाधित

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

वडील कोरोना पॉझिटिव्ह असताना मुलीचा विवाह सोहळा होत असल्याने पालिका प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. 

इचलकरंजी : सकाळी विवाह आणि सायंकाळी नववधूलाच कोरोना संसर्ग झाल्याची धक्कादायक बाब कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे रविवारी (ता. 21 फेब्रुवारी) उघडकीस आली. या सोहळ्याला सुमारे 100 हून अधिक नातेवाईक हजर होते. त्या सर्वांचे धाबे दणाणले आहे. आता नगरपालिका प्रशासनाने नववधूच्या तीव्र संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू केला. 

या नववधूचे वडील पॉझिटिव्ह असताना हा विवाह सोहळा पार पडला. पालिका प्रशासनाने नववधूच्या एका नातेवाइकासह मंगल कार्यालयाच्या अध्यक्षांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारचा गुन्हा नोंद होण्याची इचलकरंजी शहरातील ही पहिलीच वेळ आहे. विवाहाला उपस्थित राहिलेल्या सर्वांनाच आता क्वारंटाइन होण्याची सूचना पालिका प्रशासनाने केली. 

शहरात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी नगरपालिका प्रशासन ठोस उपाययोजना करीत आहे. शुक्रवारी (ता. 19) शहरात नवे तीन बाधित सापडले होते. यातील एक शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्या तीव्र संपर्कात आलेल्या रुग्णांची माहिती घेण्यासाठी आज पालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक त्यांच्या घरी गेले होते. 
या वेळी संबंधित रुग्णाच्या घरी विवाह सोहळा असल्याचे त्यांना समजले. हा विवाह सोहळा एका मंगल कार्यालयात सुरू होता. तेथे पथक पोचल्यानंतर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या नियमावलीतील संख्येपेक्षा जास्त नातेवाइक उपस्थित असल्याचे दिसले. वडील कोरोना पॉझिटिव्ह असताना मुलीचा विवाह सोहळा होत असल्याने पालिका प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. 

याबाबत थेट नववधूचा एक नातेवाईक व मंगल कार्यालयाचा अध्यक्ष अशा दोघांविरोधात कोविड प्रतिबंधक नियमावलीचा भंग केल्याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी या दोघांवर गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास सुरू केला आहे. 

दरम्यान, विवाह सोहळ्यातील नववधूचा कोरोना अहवाल सायंकाळी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सोहळ्याला उपस्थित सर्वांचेच धाबे दणाणले आहे. नववधूच्या तीव्र संपर्कात आलेल्या सर्वांचा पालिका प्रशासनाने शोध सुरू केला. या सर्वांचा स्वॅब तपासणीसाठी दिला जाणार आहे. या सर्व प्रकाराची आज शहरात जोरदार चर्चा सुरू होती. 

नववधूच्या संपर्कातील अनेक जण गेले इचलकरंजीबाहेर 
नववधूच बाधित झाल्याचे समजताच तिच्या तीव्र संपर्कात आलेले अनेक जण गायब झाले आहेत. प्रशासनाकडून क्वॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग करण्यात येत असून, त्या वेळी अनेक जण शहराबाहेर गेल्याचे समोर आले. नववधूच्या संपर्कात आलेले सर्व जणच धास्तावल्याचे दिसून येत आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख