नारायण राणे मुख्यमंत्री व्हावेत, हे नीतेश राणेंना मान्य नाही का?: वैभव नाईक  - Doesn't Nitesh Rane agree that Narayan Rane should be the Chief Minister ?: Vaibhav Naik | Politics Marathi News - Sarkarnama

नारायण राणे मुख्यमंत्री व्हावेत, हे नीतेश राणेंना मान्य नाही का?: वैभव नाईक 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

गेली 15 वर्षे आपण मुख्यमंत्री होणार, असे नारायण राणे सांगत आहेत.

कणकवली : गेली 15 वर्षे आपण मुख्यमंत्री होणार, असे नारायण राणे सांगत आहेत. पण, आमदार नीतेश राणेंना हे मान्य नसावे. त्यामुळेच ते सातत्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी आग्रही भूमिका घेत आहेत, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी आज (ता. 1 डिसेंबर) कणकवलीत केली. 

आमदार आणि कार्यकर्ते थोपवून धरण्यासाठी महाविकास आघाडी कोसळणार असल्याचा अफवा भाजपची नेतेमंडळी पसरवत आहेत, असा आरोपही आमदार वैभव नाईक यांनी केला. आमदार नाईक यांनी येथील विजय भवनमध्ये आज पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत होते. 

ते म्हणाले, "गेली पंधरा वर्षे नारायण राणे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. पण, वस्तुस्थिती काय आहे, ही त्यांच्या मुलानेच दाखवून दिली. त्याबद्दल आम्ही नीतेश राणे यांचे अभिनंदन करत आहोत. पुढील काळात राणे नव्हे, तर दुसरेच मुख्यमंत्री होतील, असा दावा खुद्द त्यांच्याच मुलाकडून केला जात आहे.'' 

आमदार नाईक म्हणाले, "सिंधुदुर्गातील जनतेला राणेंचे नेतृत्व मान्य नाही. भाजप कार्यकर्त्यांनाही राणे नकोसे झाले आहेत. त्यामुळेच महाविकास आघाडीवर टीका करण्यासाठी रवींद्र चव्हाण यांना कणकवलीत यावे लागले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर काही दिवसांतच कोरोनाचे संकट निर्माण झाले. मात्र, या काळातही महाविकास आघाडी सरकारने दमदार कामगिरी केली आहे.'' 

"सिंधुदुर्गात राणेंना गेल्या पंचवीस वर्षात जे जमले नाही, त्या शासकीय मेडिकल कॉलेजला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवघ्या वर्षभरात मंजुरी मिळवून दिली. जिल्ह्यात कोविड लॅबची उभारणी झाली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भाताला चांगला दर मिळाला. मच्छिमारांना 65 कोटींची नुकसान भरपाई जाहीर झाली. आगामी काळातही भातपीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही भरपाई जाहीर होणार आहे,'' असे नाईक म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख