नियतीने डाव साधला अन्‌ भारत भालकेंची ती प्रतिज्ञा अपूर्ण राहिली 

मागील पाच वर्षांत या पाणीप्रश्नामध्ये तत्कालीन भाजप सरकारने अपेक्षित सहकार्य न केल्यामुळे त्यांना न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागला.
That wish of MLA Bharat Bhalke remained unfulfilled
That wish of MLA Bharat Bhalke remained unfulfilled

मंगळवेढा : पिढ्यानपिढ्या दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मंगळवेढा तालुक्‍याला आतापर्यंत लाभलेल्या आमदारांमध्ये भारत भालके यांची 15 वर्षांची कारकिर्द कायम लक्षात राहील. कारण, तालुक्‍यातील भगिनींच्या डोक्‍यावरील पाण्याचा हंडा उतरविणारी भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मैलाची दगड ठरली.

पाणी प्रश्नाची निम्मी लढाई मी जिंकली. आता उर्वरित 35 गावाची लढाई जिंकली म्हणजे मी जनतेला दिलेल्या शब्दांतून मुक्त झालो, अशी भावना मनात ठेवत त्यांनी पाठपुरावा सुरू केला; त्याला प्रशासकीय मान्यता आणि टोकन निधी मिळवत काही प्रमाणात यश आले. परंतु, भारतनानांच्या अकाली जाण्याने हा पाठपुरावा अर्ध्यावर राहिला आहे. 

मंगळवेढा आणि दुष्काळ हे समीकरण कायम राहिले. शेतीच्या पाण्याचा प्रश्न तालुक्‍यामध्ये पिढ्यानपिढ्या भेडसावत असताना तालुक्‍याला उजनीचे हक्काचे अपेक्षित पाणी मिळत नव्हते. म्हैसाळचे पाणी तालुक्‍याला मिळत नव्हते. अरळी बंधाऱ्याचे पाणी तेल धोंड्याला, गुंजेगाव बंधाऱ्यातील पाणी 40 धोंड्याला अशा योजना लोकांसमोर मांडल्या; परंतु त्या योजनांची पूतर्ता होण्याच्या संदर्भातील अपेक्षित पाठपुरावा प्रयत्न होत नव्हता. अखेर 2009 मध्ये 35 गावांतील जनतेने पाण्यासाठी बहिष्कार टाकल्यानंतर ही गावे आणि त्यांचा पाणीप्रश्न राजकीय व्यासपीठावर प्रकर्षाने चर्चेला आहे. 

हाच पाणीप्रश्न हातात घेत आमदार भारत भालके यांनी पाठपुरावा सुरू केला. या भागातील शेतीला पाणी मिळाल्याशिवाय फेटा बांधणार नाही, अशी प्रतिज्ञादेखील त्यांनी केली. सुरुवातीला 35 गावाला पाणी देण्यासाठी उजनी धरणात पाणी शिल्लक नव्हते. तरीही पाण्याची तरतूद करण्यासाठी त्यांनी वाल्मी समिती नेमण्यास भाग पाडून त्यामध्ये पाणी शिल्लक असल्याचे दाखवून दिले. त्यासाठी प्रशासकीय मान्यता तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून घेऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

पण, मागील पाच वर्षांत या पाणीप्रश्नामध्ये तत्कालीन भाजप सरकारने अपेक्षित सहकार्य न केल्यामुळे त्यांना न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागला. शेवटी राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र देण्यास भाग पाडले. मागील सरकारने या योजनेतील गावे आणि पाणी कमी करण्याचा प्रयत्न केला. 

त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नाट्यमय घडामोडी घडून सत्ताबदल झाला. या सत्ता बदलाचा लाभ घेत भारतनाना भालके यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेत सर्व गावे या योजनेत समाविष्ट होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा सुरू केला. उजनीतून तालुक्‍याला मिळणारे सर्व पाणी मिळावे, यासाठी उर्वरीत कामासाठी निधी प्राप्त करून घेतला. लाभक्षेत्रातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळण्यासाठी अधिकाऱ्याच्या सातत्याने संपर्कात राहिले. 

सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्याबरोबर पाणीप्रश्‍नासाठी सातत्याने विधानसभेत आवाज उठवत अखेर म्हैसाळचे पाणी तलावात आणत केलेल्या पाठपुराव्याचे समाधान मानत त्यांनी पाणीपूजनाचे श्रेय शिरनांदगीच्या महिला सरपंच भगिनीस दिले.

पाणी चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी भालके यांची साथ सोडत विरोधी पक्षाशी घरोबा केला. त्यावेळी जोपर्यंत मी जनतेच्या मनात आहे, तोपर्यंत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व दिलेल्या शब्दाला मी बांधील आहे, अशी भूमिका घेतली होती. जनतेच्या सुख दुःखात त्यांच्याबरोबर राहिल्यानेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत नेते बरोबर नसताना केवळ जनतेच्या पाठबळावर आमदारकीची हॅट्‌ट्रीक पूर्ण केली. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com