भालकेंच्या श्रद्धांजली सभेत दिलेला शब्द राष्ट्रवादीचे नेते पाळणार का? 

भालके यांनी हाती घेतलेली कामे पूर्ण करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे म्हटले गेले होते.
Will the NCP leader keep his word regarding Pandharpur constituency?
Will the NCP leader keep his word regarding Pandharpur constituency?

मंगळवेढा : आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे पोरक्‍या झालेल्या पंढरपूर मतदारसंघाच्या पालकत्वाची जबाबदारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी श्रद्धांजली कार्यक्रमात घेतली होती. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मतदारसंघातील कामासाठी निधीची तरतूद करून राष्ट्रवादीचे नेते आपला शब्द पाळणार का? असा सवाल पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्‍यातून विचारला जात आहे. 

आपल्या दमदार भाषणाने आमदार भालके विधिमंडळाचे अधिवेशन गाजविणारे होते. तसेच सत्ताधारी-विरोधी पक्षावर छाप टाकून मतदारसंघासाठी निधी खेचून आणण्यात भालके यांचा हातखंडा होता. त्यामुळे त्यांच्या पश्‍चातही मतदारसंघाला तेवढ्याच प्रमाणात निधी मिळणार का? याची चर्चा तालुक्‍यात होत आहे. 

भारत भालके यांच्या 11 वर्षांच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये त्यांनी मंगळवेढा तालुक्‍यातील पिक विमा, दुष्काळ निधी, अतिवृष्टी, राईनपाडा हत्याकांड, मंगळवेढा उपसा सिंचन योजना, महात्मा बसवेश्वर स्मारक, चोखामेळा स्मारक, अंगणवाडी सेविका मानधन, रोजगार सेवक मानधन, संगणक परिचालक, प्रांत कार्यालय, जनावरांच्या छावण्या, दुष्काळासाठी स्वतंत्र शासकीय आदेश, प्रलंबित विजजोडणी, गौण खनिज निधी, क्षेत्र विकास आराखड्यातील निधी, पिण्याच्या पाण्यासाठीच्या योजना यांसह अनेक विषयांवरील विधानसभेत प्रश्न उपस्थित करून ते सोडविण्याचा प्रयत्न केला होता. 

राज्यात सत्ताबदल होऊन महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे मागील सरकारच्या काळात मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे पाणी व गावे कमी करण्याचा घाट घातला होता, ते पूर्ववत ठेवण्यात आमदार भालके यांना यश मिळाले होते. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेसाठी निधी मिळविण्याच्या प्रयत्नात ते होते. पण, त्यांच्या अकाली निधनामुळे हा प्रश्न अधांतरी राहिला आहे. 

आमदार भालके यांच्या श्रद्धांजली सभेत आणि सांत्वन भेटीच्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी मतदारसंघाला पोरके सोडणार नसल्याची ग्वाही दिली होती. भालके यांनी हाती घेतलेली कामे पूर्ण करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे म्हटले गेले होते. त्यामुळे या मतदारसंघातील नागरिकांना एक प्रकारे दिलासा मिळाला होता. 

चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवेढा तालुक्‍यास मंगळवेढा उपसा सिंचन योजनेबरोबर नवीन काय मिळणार? याची उत्सुकता आहे. प्रशासनावर जबर पकड असलेला भालके यांच्यासारखा नेता गमावल्यामुळे प्रशासनात सध्या अधिकाऱ्यांची मर्जी सुरू असल्याचे चित्र सध्या तालुक्‍यात आहे. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते उमेदवारी आणि इतर गोष्टींमध्ये गुंतून असल्याने तालुक्‍यातील सर्वसामान्य जनतेला त्यांच्या कामासाठी शासकीय कार्यालयात वारंवार हेलापाटे मारावे लागत आहे. 

भालके यांनी दवाखान्यात असताना त्यांचे स्वीय सहायक रावसाहेब फटे यांना भगीरथ भालके यांना सोबत घेऊन पाठपुरावा करण्याचा मेसेज मोबाईलवरून पाठविला होता. त्याप्रमाणे प्रयत्न होऊन अर्थसंकल्पात मंगळवेढ्यासाठी किती तरतूद होते? याकडे तालुक्‍यातील जनतेचे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com