खवतोडेंना संधी देऊन राष्ट्रवादीने सुरू केली नगरपालिका निवडणुकीची तयारी - Vijay Khawatode elected to Planning Committee on the backdrop of Mangalwedha Municipal Election | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

खवतोडेंना संधी देऊन राष्ट्रवादीने सुरू केली नगरपालिका निवडणुकीची तयारी

हुकूम मुलाणी 
शुक्रवार, 2 जुलै 2021

राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना काँग्रेसमधून संधी देऊन त्यांना विजयी करण्याची किमया भारत भालके यांनी साधली होती.

मंगळवेढा (जि. सोलापूर)  ः पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा नियोजन समितीवर माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय सेलचे विजय खवतोडे यांना संधी देत पक्षाने निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. (Vijay Khawatode elected to Planning Committee on the backdrop of Mangalwedha Municipal Election)

आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर मतदारसंघात सहानुभूतीची लाट असताना झालेला धक्कादायक पराभव राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. मात्र, आगामी जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विविध पदावर संधी देण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीवर सध्या नगरपालिकेतील पक्षनेते अजित जगताप हे कार्यरत असताना नव्या नेमणुकीत ही संधी ग्रामीण भागास मिळणे अपेक्षित होते. मात्र, डिसेंबरमध्ये होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीचा विचार करता मंगळवेढा शहरातील 48 बूथपैकी फक्त तीन बूथवरच राष्ट्रवादीला पोटनिवडणुकीत मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात राहावी, या दृष्टीने माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय सेलचे विजय खवतोडे यांना जिल्हा नियोजन समितीवर संधी देत निवडणुकीची व्यूहरचना करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा : राजकीयदृष्ट्या त्रासदायक ठरणाऱ्या माणसाचा काटा काढण्यासाठी ईडीचा वापर  

मंगळवेढा शहरात राहुल शहा, लतीफ तांबोळी, पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष अनिता नागणे, अजित जगताप, नगरसेवक प्रवीण खवतोडे, विद्यमान नगराध्यक्ष अरुणा माळी यांचे पती सोमनाथ माळी, शहराध्यक्ष मुजम्मिल काझी, शहराध्यक्ष संदीप बुरकुल यांच्या बरोबरीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारे आणि कार्यकर्त्यांच्या बळावर सध्या राष्ट्रवादीचे अस्तित्व टिकून आहे. मात्र, पोटनिवडणुकीत मंगळवेढा शहरात कमी मतदान मिळाल्याचा फटका पक्षाला पराभावाचे तोंड पाहण्यात बसला आहे. 

दरम्यान, घरगुती कारणास्तव अनिता नागणे यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. शहरात महिलांची मोट बांधण्यासाठी कार्यक्षम नेतृत्वाची आवश्यकता आहे. यापूर्वीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी एकत्र येत लढविली होती. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना काँग्रेसमधून संधी देऊन त्यांना विजयी करण्याची किमया भारत भालके यांनी साधली होती. यंदा तेच काँग्रेसचे काही नगरसेवक सध्या भाजपच्या गळाला लागले आहेत, त्यामुळे सध्या शहरात काँग्रेस आपले अस्तित्व शोधावे लागणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसला नगरपालिकेत पुन्हा वर्चस्व मिळविण्यासाठी राज्यातील सत्तेच्या माध्यमातून रखडलेल्या प्रश्नांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी  प्रयत्न सुरु आहेत. मात्र भाजपच्या दोन आमदारासमोर राष्ट्रवादीचा कितपत टिकाव लागणार, हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ग्रामीण भागातील अनेक इच्छुकांना डावलून खवतोडे यांना दिलेली संधी पक्षासाठी उपयुक्त ठरेल का, याचे उत्तरही काही महिन्यांनंतर मिळणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख