ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी वैराग होणार नगरपंचायत : दत्तात्रेय भरणे 

ग्रामपंचायतीची निवडणूक होणार की नगरपंचायत होणार, याकडे वैरागच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Vairag Gram Panchayat will be transformed into Nagar Panchayat : Dattatreya bharane
Vairag Gram Panchayat will be transformed into Nagar Panchayat : Dattatreya bharane

वैराग (जि. सोलापूर) : ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वीच वैराग (ता. बार्शी, जि. सोलापूर) ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रुपांतर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, असे सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले. 

भरणे हे सोलापूरवरून बार्शीकडे जात असताना वैराग येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते निरंजन भूमकर यांच्या निवासस्थानी थांबले होते. त्या ेवेळी "वैराग ग्रामपंचायतचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये करण्याचा आदेश मंत्रालय स्तरावरून निघाले आहेत,' अशी चर्चा सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याबाबत भरणे यांना विचारले असता त्यांनी वरील भूमिका मांडली. 

ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगूल वाजण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीची निवडणूक होणार की नगरपंचायत होणार, याकडे वैरागच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे. कारण, राज्य सरकारच्या वतीने वैराग नगरपंचायत करण्यासंदर्भात 2 डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन विभागाला पत्र देण्यात आले आहे. 

याबाबत पालकमंत्री भरणे यांना विचारले असता ते म्हणाले की, नगरपंचायत होणे हे गावाच्या विकासाच्या दृष्टीने चांगलेच आहे. सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल. शिवाय येथील कर्मचारी नगरपंचायतीमध्ये वर्ग होऊन त्यांचा दर्जा वाढेल, त्यातून त्यांना पगार वाढही मिळेल. 

याबाबत सरकार दरबारी सर्वतोपरी तयारी सुरू असून स्वतः लक्ष घालून काम करणार आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक लागणार की त्यापूर्वी वैराग नगरपंचायत होईल. याबाबत त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी नगरपंचायत अस्तित्वात येईल, असा विश्‍वास व्यक्त केला. 

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून वैराग ग्रामपंचायतचे रुपांतर नगरपंचायतमध्ये करावे, असा प्रस्ताव सात फेब्रुवारी 2020 रोजी राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. त्या प्रस्तावाचे अवलोकन केले असता प्रस्तावासोबत अनुसूची 'अ' मध्ये प्रस्तावित नगरपंचायतीमध्ये समाविष्ट करावयाचे क्षेत्र (सर्वे क्रमांकांची यादी) व अनुसूची- ब (संक्रमणात्मक क्षेत्रातील स्थानिक क्षेत्राच्या हद्दीचा तपशील) याबाबत सविस्तर माहिती सरकारला तत्काळ सादर करण्यात यावा, असा आदेश नगरविकास विभागाने 2 डिसेंबर रोजीच्या पत्राद्वारे सोलापूर जिल्हा प्रशासन विभागास केला होता. 

त्यानुसार सर्व सविस्तर प्रस्तावित माहिती सरकारला सादर करण्यात आली आहे. त्यामुळे वैराग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रुपांतर होण्याबाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com