राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठेंनंतर मुलालाही मिळाली सरपंचपदाची संधी  - Unopposed elected of Jitendra Sathe as Sarpanch of Wadala Gram Panchayat | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठेंनंतर मुलालाही मिळाली सरपंचपदाची संधी 

संतोष सिरसट 
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

जवळपास साडेचोवीस वर्ष त्यांनी वडाळ्याचे सरपंच म्हणून काम पाहिले होते.

उत्तर सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील वडाळा (ता. उत्तर सोलापूर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जितेंद्र साठे यांची, तर उपसरपंचपदी अनिल माळी यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम (काका) साठे हेही वडाळ्याचे सरपंच होते. काका साठे यांच्यानंतर तब्बल 31 वर्षांनंतर त्यांचे सुपुत्र तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे यांना वडाळ्याचे सरपंचपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. 

वडाळा व वांगी या दोन गावच्या सरपंच, उपसरपंच निवडी गुरुवारी (ता. 11 फेब्रुवारी) जाहीर करण्यात आल्या. त्यात वांगी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हनुमंत गाडे यांची, तर उपसरपंचपदी आबासाहेब आवताडे यांची निवड करण्यात आली. 

दरम्यान, वडाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जितेंद्र साठे यांची निवड झाली आहे. जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते बळिराम साठे यांनी 1989 पर्यंत गावच्या सरपंचपदाची धुरा सांभाळली होती. जवळपास साडेचोवीस वर्ष त्यांनी वडाळ्याचे सरपंच म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर तब्बल 31 वर्षाने त्यांच्या चिरंजीवाच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली आहे. 

मागील अनेक वर्षांपासून वडाळा ग्रामपंचायतीवर बळिराम साठे यांची एकहाती सत्ता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. वडाळा ही ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी थोड्या फार प्रमाणात प्रयत्न झाले होते. मात्र, त्यामध्ये त्यांना यश आले नव्हते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मात्र ग्रामपंचायतीच्या सर्वच्या सर्व जागा साठे गटाने जिंकल्या होत्या. 

वांगी ग्रामपंचायतीवर मागील अनेक वर्ष पाटील गटाची सत्ता होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत ती सत्ता उलथून लावत आबासाहेब आवताडे यांनी सत्ता मिळवली आहे. ते साठे यांचे समर्थक आहेत. वांगीच्या सरपंचपदी गाडे यांची निवड करण्यात आली. सरपंच आरक्षणामध्ये वांगीचे सरपंच आरक्षण अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव होते. मात्र त्या ठिकाणी अनुसूचित जाती महिलेचा ग्रामपंचायत सदस्य नसल्यामुळे अनुसूचित जाती पुरुषाला सरपंच होण्याची संधी मिळाली आहे. उपसरपंचपदी पॅनेल प्रमुख आवताडे यांची निवड करण्यात आली आहे. 

लष्करी सेवेनंतर घेतला लोकसेवेचा वसा 

वांगीच्या सरपंचपदी निवड झालेले गाडे हे पदवीधर असून युवक आहेत. त्यांनी 2016 मध्ये पदवी घेतली आहे. उपसरपंचपदी विराजमान झालेले आवताडे हे माजी सैनिक आहेत. लष्करातील सेवा समाप्तीनंतर त्यांनी लोकसेवेचा वसा घेत गावच्या उपसरपंचपदी विराजमान होण्याचा मान मिळविला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख