आमदारकीचे तिकीट नाकारलेल्या नारायण पाटलांना ठाकरेंकडून भेटीचे निमंत्रण 

उमेदवारी नाकारून केलेली चूक शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दुरुस्त करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.
Uddhav Thackeray invites Narayan Patil, who was denied MLA ticket, to meet him
Uddhav Thackeray invites Narayan Patil, who was denied MLA ticket, to meet him

करमाळा : करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांना विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत उमेदवारी नाकारून केलेली चूक शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दुरुस्त करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. कारण, उमेदवारी न देताही शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले नारायण पाटील यांना राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईला बोलावून घेत त्यांच्याशी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पक्षवाढीबाबत चर्चा केली. या वृत्ताला नारायण पाटील यांनीही दुजोरा दिला आहे. 

विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर नारायण पाटील यांनी पाच वर्षांत करमाळा विधानसभा मतदारसंघात केलेली विकासकामे व त्यांचा जनसंपर्क पाहता 2019 च्या निवडणुकीत शिवसेना त्यांची उमेदवारी कापेल, असे स्वप्नातदेखील कोणाला वाटत नव्हते. मात्र, तत्कालीन जलसंधारण मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी ऐनवेळी रश्‍मी बागल यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून शिवसेनेत आणत करमाळ्याची उमेदवारी बहाल करण्यात आली. 

शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यानंतर नारायण पाटील यांनी गेल्या विधानसभेला अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली. या निवडणुकीत अन्य पक्षाकडून ऑफर असतानाही पाटील यांनी अपक्ष लढण्याची भूमिका घेतली. अपक्ष लढूनही त्यांना शिवसेनेच्या उमेदवार रश्‍मी बागल यांच्यापेक्षा 25 हजार मते जास्त मिळाली. त्यांचा या निवडणुकीत निसटता पराभव झाला, त्यांना 75 हजारांच्या घरात मते मिळाली. पाटील यांना झालेले मतदान पाहता शिवसेनेने उमेदवारी डावलून चूक केली, हे सर्वांच्याच लक्षात आले. 

शिवसेनेकडून निवडणूक लढून पराभूत झालेले जिल्ह्यातील उमेदवार सोयीनुसार वागत असताना माजी आमदार नारायण पाटील यांनी मात्र शिवसेनेशी आपली नाळ तुटू दिली नाही. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही त्यांनी आपली बाजू भक्कमपणे सांभाळून ठेवली. तसेच, त्यांच्याच नेतृत्वाखाली जिल्ह्यातील करमाळा ही एकमेव पंचायत समितीही शिवसेनेकडे आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेत अंतर्गत विविध घडामोडी घडत असताना माजी आमदार नारायण पाटील यांना थेट मातोश्रीचा निरोप येणे, हा विषय तास चर्चेचा झाला आहे. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत येऊन धनुष्यबाणावर निवडणूक लढलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वच नेतेमंडळी सोयीनुसार वागत आहेत. काही पूर्वीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे असल्याने त्यांच्या ज्येष्ठ नेते शरद पवारांकडे चकरा वाढल्या आहेत. 

तसे पाहिले तर सर्वच आयत्या वेळेचे शिवसेनेचे उमेदवार आज शिवसेनेपासून चार हात दूर असल्याचे चित्र सोलापूर जिल्ह्यात आहे. अशा परिस्थितीत उमेदवारी डावलूनदेखील नारायण पाटील हे मात्र शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले, याची जाणीव ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निरोप पाठवून पाटील यांना मुंबईला बोलावून घेतले. त्यांच्याशी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पक्षवाढीसाठी चर्चा केल्याची माहिती आहे. या वृत्ताला पाटील यांनी दुजोरा दिला आहे. 


आगामी काळात न्याय देण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका ः नारायण पाटील 

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला मुंबईला बोलावून घेतले होते. आमची वर्षा बंगल्यावर बैठक झाली. या वेळी खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. 

या चर्चेत केवळ तानाजी सावंत यांच्यामुळे माझी विधानसभेची उमेदवारी कापण्यात आली, त्यामुळेच करमाळा मतदारसंघ शिवसेनेला गमवावा लागला. याशिवाय जिल्ह्यात शिवसेनेचे जे उमेदवार निवडून येण्याची क्षमता असूनही त्यांना डावलून प्रा. सावंत यांनी मनमानी करत इतरांना उमेदवारी वाटली, त्यामुळेच जिल्ह्यात शिवसेनेची पिछेहाट झाली, हे सर्व उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आले आहे. शिवसेनेने आयत्या वेळी उमेदवारी डावलूनही आपण पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचे वरिष्ठांनी ओखळले आहे. आगामी काळात न्याय देण्याची भूमिका असेल, असे त्यांनी मला सांगितले आहे, असे करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी नमूद केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com