पंढरपुरात मोठी घडामोड : राजू शेट्टींच्या स्वाभिमानीचा पोटनिवडणुकीत अधिकृत उमेदवार 

माजी खासदार राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार पाटील यांच्या प्रचारासाठी पंढरपुरात तळ ठोकून राहणार आहेत.
Swabhimani Shetkari Sanghatana will be the official candidate for the Pandharpur by-election
Swabhimani Shetkari Sanghatana will be the official candidate for the Pandharpur by-election

पंढरपूर : महायुतीमधून बाहेर पडून महाविकास आघाडीत सामील झालेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरले आहे. राज्यातील महाविकास आघाडीला मोठा धक्का देत पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटना पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे मंगळवारी (ता. 30 मार्च) अधिकृतरित्या स्पष्ट झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्या उमेदवारी अर्जासोबत स्वाभिमानी पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज आपल्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करत महाविकास आघाडीच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. 

माजी खासदार राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार पाटील यांच्या प्रचारासाठी पंढरपुरात तळ ठोकून राहणार आहेत. ते गावोगावी जावून प्रचार सभाही घेणार आहेत. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पंढरपूर मतदारसंघावर दावा केला होता. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टींची भेट घेत मतदारसंघासाठी आग्रह धरला होता. शेट्टींनीही त्याबाबत महाआघाडीच्या नेत्यांशी चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले होते. 

पंढरपूर मतदारसंघ स्वाभिमानीसाठी सोडण्याचा आग्रह धरताना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी याअगोदर संघटना या मतदारसंघातून निवडणूक लढल्याचे दाखले दिले होते. "रिडालोस'मध्ये 2009 मध्ये सहभागी असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून त्यावेळी खुद्द भारत भालके लढले होते. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत भालके त्या निवडणुकीत जायंट किलर ठरले होते. विधान परिषदेचे विद्यमान आमदार प्रशांत परिचारक यांनीही 2014 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी भालकेंनी परिचारकांना मात दिली होती. 

शेतीमालाच्या हमीभावासाठी तसेच, दूध आणि ऊसदारासाठी राजू शेट्टी यांनी या भागात अनेक आंदोलने केली आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकत शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शेट्टी आणि स्वाभिमानीशी जोडलेले शेतकरी, कामगार आणि इतर वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. 

मागील या निवडणुकांचा विचार करून पोटनिवडणुकीसाठी ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडावी, अशी मागणी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्‍यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेट्टींची भेट केली होती. स्वाभिमानीकडून पंढरपूरचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, माजी उपसभापती विष्णूपंत बागल, मंगळवेढा येथील ऍड. राहुल घुले यांनी आमच्या तिघांपैकी कोणालाही उमेदवारी द्या; पण मतदारसंघ स्वाभिमानीकडे घ्या, अशी विनंती शेट्टींना केली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com