स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवेढ्यात खाते उघडले  - Swabhimani Shetkari Sanghatana opened an account in Mangalvedha taluka | Politics Marathi News - Sarkarnama

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवेढ्यात खाते उघडले 

हुकूम मुलाणी 
मंगळवार, 19 जानेवारी 2021

ग्रामपंचायत निवडणुकीत या संघटनेने चंचूप्रवेश केला आहे. 

मंगळवेढा (जि. सोलापूर) : मंगळवेढा तालुक्‍यात ऊसदर आणि पिक विमा यासाठी सातत्याने आंदोलन करून शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका घेतलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेत खाते उघडले. ग्रामपंचायत निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत. 

गेल्या चार वर्षांपासून सातत्याने शेतकऱ्यांना पीक विमा, दुष्काळ निधी, ऊस दर आदीसाठी सातत्याने संघर्ष करावा लागत आहे. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते, तर 2018 या वर्षातील खरीप पिकविमा मिळावा म्हणून कंपनीच्या सोलापूर कार्यालयावर धडक मारण्यात आली होती. पीक विम्यातून वगळलेल्या जवळपास 4012 शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. 

याशिवाय, नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळवून देणे, विजेच्या प्रश्नासाठी महावितरणच्या कार्यालयात सातत्याने पाठपुरावा करणे, उजनीचे पाणी कालव्याद्वारे वेळेत सोडणे, तसेच दुष्काळ निधीचे वाटप करावे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे तातडीने करावे. यंदाच्या गळीत हंगामात पूर्वी ऊसदर निश्‍चित करावा, आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलने केली होती. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र युवा आघाडीचे उपाध्यक्ष ऍड. राहुल घुले, श्रीमंत केदार, संतोष बिराजदार, अनिल बिराजदार, हर्षद डोरले, आबा खांडेकर, दत्तात्रेय गणपाटील यांनी वेळोवेळी शेतकरी हिताची बाजू घेत लढा उभारलेला आहे. सहाजिकच शेतकऱ्यांना संघटनेबद्दल पूर्वीपासूनच आस्था वाटत आहे. त्यातूनच मंगळवेढा तालुक्‍यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत या संघटनेने चंचूप्रवेश केला आहे. 

नुकत्याच झालेल्या 23 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार हे डोणजमध्ये विजयी झाले आहेत. या संघटनेचे दत्तात्रेय गणपाटील यांच्या मातोश्री व शाखाध्यक्ष नितीन घुले हे मरवडे ग्रामपंचायतीत विजयी झाले आहेत. अरळीचे शाखाध्यक्ष मल्लिकार्जुन भांजे तसेच रतन रजपूत यांच्या मातोश्री, लक्ष्मण जमदाडे यांच्या पत्नी या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. 

स्थानिक स्वराज्य संस्थेतील गावगाड्यात यश मिळू लागल्यामुळे या संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विश्वास वाढीस लागला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख