सोलापूर क्राईम ब्रॅंचच्या पोलिस पथकावर माढ्यात दगडफेक 

त्या परिसरातील संबंधितांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक सुरू केली
Stone pelting on Solapur Crime Branch police squad at Madha
Stone pelting on Solapur Crime Branch police squad at Madha

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पोलिसांवर हल्ला करण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. माढा तालुक्‍यात सोलापूर ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकावर दगडफेक करण्यात आली आहे, त्यात पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. मात्र त्यांचा आकडा समजू शकला नाही. दुसरी घटना बार्शी तालुक्‍यात घडली असून डयूटी संपवून घरी निघालेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यास चौघांनी मारहाण केली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. 

सोलापूर ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक आज (ता. 8 जानेवारी) एका गुन्ह्यातील संशयित आरोपींना पकडण्यासाठी बारलोणी (ता. माढा) येथे गेले होते. त्या वेळी पथकावर दगडफेक करण्यात आली. त्यात गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. नेमके कितीजण जखमी झाले आहेत हे समजू शकले नाही. 

सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, पोलिस हवालदार नारायण गोलेकर, पोलिस हवालदर धनाजी गाडे, पोलिस हवालदार मोहन मनसावले, पोलिस शिपाई अक्षय दळवी, पोलिस शिपाई धनराज गायकवाड व चालक पोलिस शिपाई समीर शेख यांचे पथक सांगोला येथे घडलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना पकडण्यासाठी बारलोणी येथे गेले होते.

हे पाहताच त्या परिसरातील संबंधितांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक सुरू केली. त्यांच्या दगडफेकीत पोलिस पथकातील कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात येते. घटना समजताच पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे, इतर पोलिस अधिकारी व पोलिस पथके बारलोणी गावात पोचली आहेत. 

बार्शीत महिला पोलिसावर प्राणघातक हल्ला 

बार्शी शहरातील पोलिस उपअधीक्षक कार्यालयातून सेवा संपवून साकत पिंपरी येथील घरी जाताना महिला पोलिस कर्मचारी रेश्‍मा सुतार यांना बार्शी-तुळजापूर रस्त्यावर शेलगावजवळ चौघांनी मारहाण केली. या प्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिस कर्मचारी रेश्‍मा सुतार यांनी फिर्याद दिली आहे. बार्शी येथील उपअधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या सुतार कार्यालयीन कामकाज संपवून साकत पिंपरी येथे स्कूटीवर घरी जात होत्या. त्या वेळी शेलगाव जवळ दोन व्यक्ती दुचाकीवरुन पाठीमागून आल्या आणि सुतार यांच्या स्कूटीला लाथ मारली. 

सुतार रस्त्याच्या बाजूला पडल्या. त्या वेळी हल्लेखारे त्यांना उद्देशून म्हणाले, "कर गुन्हा दाखल, माझ्या मेव्हण्यावर गुन्हा दाखल करतेस का? कर' असे म्हणून निघून गेले. उठून गाडी उभी करत असताना पुन्हा दुसरे दोघे दुचाकीवर आले. "आज तू घरापर्यंत कशी पोचते तेच बघतो, तुला मी आज ठार मारत असतो,' असे म्हणत धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला. पण, वार चुकविल्याने सुतार बचावल्या. वाहने येत असल्याचे पाहून दोघेही दुचाकीवरून बार्शीकडे पसार झाले. 

रेश्‍मा सुतार यांनी पतीला फोन करून याबाबतची माहिती दिली. त्यांनी येऊन रेश्‍मा यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे तपास करीत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com