भालकेंच्या मतदारसंघावर शिवसेनेचा पुन्हा दावा; महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे 

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी आग्रही राहणार असल्याचा इरादा शिवसैनिकांनी आज (ता. 27 फेब्रुवारी) पुन्हा व्यक्त करत यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा निर्णय घेतला आहे.
Shiv Sena re-claims Pandharpur-Mangalwedha constituency
Shiv Sena re-claims Pandharpur-Mangalwedha constituency

मंगळवेढा : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा रणसंग्राम सुरू होण्यास काही दिवसांचाच अवधी असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीतील मुख्य घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनेदेखील ही जागा मूळ आपलीच असल्याचा दावा केला आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी आग्रही राहणार असल्याचा इरादा शिवसैनिकांनी आज (ता. 27 फेब्रुवारी) पुन्हा व्यक्त करत यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा निर्णय घेतला आहे. 

शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या शैला गोडसे या गेल्या काही वर्षांपासून मंगळवेढ्यातील मतदारांशी सातत्याने संपर्कात आहेत. शिरनांदगी तलावातील आंदोलनापासून ते भोसे प्रादेशिक पाणी योजनेपर्यंत त्यांचा सातत्याने शासकीय कार्यालयात पाठपुरावा सुरू आहे. परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीमध्ये ही जागा रयत क्रांती पक्षाला सोडण्यात आल्याने शिवसेनेला ही जागा जागा मिळू शकली नाही, त्यामुळे शैला गोडसे यांना दाखल केलेला उमेदवारीअर्ज माघारी घ्यावा लागला होता. 

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले आमदार भारत भालके विजयी झाले होते. पण, त्यांच्या अकाली निधनामुळे या जागेसाठी आता पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराविषयी तर्कवितर्क सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही जनतेचा मनातील उमेदवार देणार असल्याचे सूतोवाच करत जवळपास भगिरथ भालके यांची उमेदवारी नक्की समजली जात आहे. परंतु शेवटी या बाबतचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे याच घेणार असल्याचे वक्तव्य पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी मंगळवेढा येथे माध्यमांशी बोलताना शुक्रवारी (ता. 26 फेब्रुवारी) व्यक्त केले. 

भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण? हेही अद्याप अजून निश्‍चित झालेले नाही. दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे हेदेखील या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मतदारांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे ते विधानसभेचे उमेदवार नक्की असण्याची शक्‍यता आहे. 

जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांनी आज (ता. 27 फेब्रुवारी) मंगळवेढा येथे संपर्क कार्यालय सुरू करून आपणही शिवसेनेतून इच्छुक असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर मंगळवेढा तालुका हा पंढरपूरशी जोडला गेल्यामुळे सुरुवातीला ही जागा शिवसेनेकडे होती. त्यानंतर 2014 मध्ये ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला, तर 2019 मध्ये हा मतदारसंघ युतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेला देण्यात आला, त्यामुळे 2009 च्या फार्म्युल्याप्रमाणे ही जागा शिवसेनेकडे राहावी, अशी मागणी शिवसैनिकांनी आजच्या संपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी केली.

सध्या पोटनिवडणुकीचा आखाडा जाहीर होण्याआधीच जागा निश्‍चितीसाठीचा आखाडा महाविकास आघाडीत सुरू झाला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com