महाविकास आघाडीत धूसफूस : शिवसेना आमदाराची थेट शरद पवारांवर टीका - Shiv Sena MLA Shahaji Patil criticizes Sharad Pawar over Ujani dam water | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

महाविकास आघाडीत धूसफूस : शिवसेना आमदाराची थेट शरद पवारांवर टीका

भारत नागणे
सोमवार, 17 मे 2021

काही दिवसांपूर्वी जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त सचिवांना पुन्हा विभागात आणल्याने जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव सीतराम कुंटे यांना सुनावले होते.

पंढरपूर : राज्यातील महाविकास आघाडीत पुन्हा एकदा धूसफूस सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त सचिवांना पुन्हा विभागात आणल्याने जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव सीतराम कुंटे यांना सुनावले होते. ‘हे असेच चालणार असेल, तर विभागच बंद करून टाका,’ असा हल्लाबोल पाटील यांनी केला होता. त्यानंतर आता उजनी धरणाच्या  (Ujani Dam) पाण्यावरून शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील (MLA Shahaji Patil) यांनी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. उजनी धरण पुणे जिल्ह्यात वळवण्याची यंत्रणा असती, तर धरणसुद्धा शरद पवारांनी बारामतीत नेलं असतं, असा टोला त्यांनी पवारांना लगावला आहे. (Shiv Sena MLA Shahaji Patil criticizes Sharad Pawar over Ujani dam water)

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याला उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या निर्णयास सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध केला जात आहे. याच मुद्यावरून भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी महाविकास आघाडीचे कर्तेकरविते असलेल्या शरद पवारांवरच उजनीच्या पाण्यावरून निशाणा साधला आहे. उजनीचे पाणी इंदापूरला (Indapur) नेले, तर सोलापूर जिल्ह्यात रक्तरंजित आंदोलन केले जाईल, असा इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे. 

हेही वाचा : एकाचे मुंबई तर दुसऱ्याचे बारामतीवर लक्ष..राज्य वाऱ्यावर..सरकार ‘सह्याजीराव’ झालयं..

आमदारांच्या घरासमोर आंदोलन

उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकरी नेते माऊली हळणवर आणि दीपक भोसले यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांत जाऊन उजनीचे पाणी इंदापूरला देण्याच्या निर्णयाविरोधात जागृती सुरू केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराच्या घरासमोर जाऊन पाणी संघर्ष समितीचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. या समितीच्या कार्यकर्त्यांनी आज (ता. १७ मे) आमदार शहाजी पाटील यांच्या सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील घरासमोर जाऊन आंदोलन केले. त्या वेळी त्यांनी या निर्णयास आपला विरोध असल्याचे स्पष्टपणे सांगितले. 

हे पवारांचे विकासाचे मॉडेल 

सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराला विश्वासात न घेता इंदापूरला उजनीचे पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा सोलापूरमधील शेतकऱ्यांवर अन्याय आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या विचाराचे सरकार राज्यात ज्या ज्या वेळी आले, तेव्हा तेव्हा त्यांनी केवळ बारामतीचाच विकास केलेला आहे. राज्याचा सर्व निधी बारामतीकडे वळवायचा आणि बारामती हे विकासाचे मॉडेल आहे, हे देशभर सांगत फिरायचे, ही त्यांची राजकीय पद्धत आहे. पवारांनी केवळ बारामतीचाच विकास केला आहे, असा आरोपही आमदार पाटील यांनी या वेळी केला.

...तर पवारांनी धरणसुद्धा वळवलं असतं

उजनी धरणातून बारामती एमआयडीसी, बारामती शहर आणि  सिनर्मास प्रकल्पास पाणी नेण्यात आले आहे. एवढं पाणी नेऊनही शरद पवारांना अजूनही पाणी कमी पडतंय, असं वाटत आहे. धरण वळवण्याची एखादी यंत्रणा असती, तर उजनी धरणसुद्धा शरद पवारांनी त्यांच्या भागात (बारामतीत) नेलं असतं, अशी जोरदार टीका पाटील यांनी पवारांवर केली. 

उजनी धरणाच्या पाण्यावरून पवार विरुद्ध सोलापूर जिल्हा असा संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यातून राज्यातील महविकास आघाडीलाही मोठे दणके बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख