बसवेश्वर स्मारकासाठी शिवसेना नेत्याचे अजित पवारांना साकडे

स्मारकाचा प्रश्न मार्गी लागण्याऐवजी राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपाचा विषय होऊन बसला आहे.
Shiv Sena leader demand to Ajit Pawar resolve the issue of Basaveshwar memorial
Shiv Sena leader demand to Ajit Pawar resolve the issue of Basaveshwar memorial

मंगळवेढा (जि. सोलापूर) : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मंगळवेढा शहरातील महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी आगामी अर्थसंकल्पात 100 कोटींची तरतूद करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा महिला आघाडीच्या नेत्या शैला गोडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत दिले. काही वर्षांपासून रेंगाळलेला हा प्रकल्प मार्गी लावावा, असे साकडेही त्यांनी अजितदादांना घातले.         

मंगळवेढा शहरालगत महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांमधून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मागील भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात याबाबत तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समिती निश्चित करण्यात आली होती. या समितीकडून कृषी खात्याची 35 एकर जागा निश्चित करून 100 फुटांची मूर्ती, स्मारक परिसरामध्ये ग्रंथालय, ध्यानकेंद्र, अभ्यास केंद्र स्मारक, कृषी पर्यटन स्थळ, भक्त निवास, शेतकरी निवास, महात्मा बसवेश्वर यांची माहिती देणारे फलक आदींचा समोवश असलेला आराखडा निश्चित करण्यात आला होता. 

या समितीने 151 कोटी खर्चाचा आराखडा बनवून तो सरकारला सादर केला होता. आमदार भारत भालके यांनी विधानसभेत याबाबत अनेक वेळा आवाजदेखील उठवला होता. परंतु मागील सरकारच्या काळात या स्मारकाची देखभाल-दुरुस्ती करण्याची जबाबदारी कोणी घ्यायची, यावरून हा प्रस्ताव परत आला होता. नगरपालिकेने त्याबाबतचे पत्र दिले होते. परंतु ही जागा नगरपालिकेच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर असल्याने याबाबतची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी खात्याकडे केली असल्याचे समजते. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोलापूर दौऱ्यात यापूर्वी केलेल्या घोषणेवरून भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी नामधारी उपमुख्यमंत्री म्हणत अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यावर आमदार भारत भालके यांनी या टीकेला उत्तर देताना विजयकुमार देशमुख हे या स्मारक समितीचे अध्यक्ष असतानाही बसवेश्वर स्मारकाचा प्रश्न रखडत ठेवल्याबद्दल जोरदार हल्लाबोल केला होता. त्यामुळे स्मारकाचा प्रश्न मार्गी लागण्याऐवजी राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपाचा विषय होऊन बसला आहे.

मध्यंतरीच्या काळात मंगळवेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अरुणा माळी यांनीही शैला गोडसे यांच्यासह सोलापुरात जाऊन शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com