शिवसेनेचा नगराध्यक्ष करण्यासाठी कामाला लागा 

शिवसेनेच्या वतीने ही निवडणूक स्वबळावर लढवली जाणारआहे.
Shiv Sena to contest Shirur Municipal Council elections on its own: Dnyaneshwar Cutake :
Shiv Sena to contest Shirur Municipal Council elections on its own: Dnyaneshwar Cutake :

शिरूर (जि. पुणे) : शिरूर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेचे स्वतंत्र पॅनेल उभे केले जाईल. कुणाशीही युती न करता शिवसेनेच्या वतीने ही निवडणूक स्वबळावर लढवली जाणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी जाहीर केले. नगर परिषदेसाठी स्वतंत्र पॅनेलची व्यूहरचना करताना नगराध्यक्ष शिवसेनेचाच बसेल, अशी खूणगाठ शिवसैनिकांनी मनाशी बांधावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

शिवसेनेच्या शिरूर शहर व तालुक्‍यातील सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात शिरूरमध्ये झाली. त्या वेळी कटके यांनी वरील आवाहन केले. शिवसेनेचे सदस्यत्व स्वीकारलेल्या तरूणांना कटके यांनी शिवबंधन बांधले. प्राथमिक सदस्य नोंदणीसाठी उभारलेल्या दालनाचे उद्‌घाटन शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने झाले. शिरूर नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते मंगेश खांडरे, नगरसेवक नीलेश गाडेकर, युवा सेनेचे तालुका संघटक नीलेश गवळी, पोपट ढवळे, राजेंद्र चोपडा, मंगेश कवाष्टे, स्वप्निल रेड्डी, संपत दसगुडे, आकाश चौरे, सुनिल जठार, आकाश क्षीरसागर, सिद्धांत चव्हाण, विकी उमाप, राजू शिंगोटे, ऋषिकेश शितोळे आदींसह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. 

राज्य सरकारचे जनकल्याणाचे निर्णय शिवसैनिकांनी घरोघर पोचवावेत, असे आवाहन कटके यांनी केले. ते म्हणाले, "राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काम पाहात आहेत. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून जनतेला दिलासा दिला आहे. सार्वजनिक हिताच्या योजनांबरोबरच; वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना सरकारच्या माध्यमातून सुरू केल्या आहेत. या योजना व त्यांचे थेट लाभ समाजापर्यंत पोचविण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी तळागाळातील जनतेपर्यंत पोचावे. सामान्यांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी वॉर्डनिहाय नियोजन करावे. शिरूरचा आगामी नगराध्यक्ष शिवसेनेचा असेल, अशी खूणगाठ शिवसैनिकांनी मनाशी बांधावी व त्यादृष्टीने आत्तापासूनच कामाला लागावे.'' 

शिरूर नगरपरिषदेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. त्यादृष्टीने पक्षबांधणी मजबूत करताना तरूणांबरोबरच समाजातील सर्व घटकांचे, विविध क्षेत्रातील मान्यवरांचे पक्षात स्वागत आहे. पक्षात येण्यास इच्छूक असणारांना सन्मानाने प्रवेश दिला जाईल व त्यांच्या ज्ञानाची, विचारांची, गुणवत्तेची व त्यांच्या क्षेत्रातील माहितीची कदर केली जाईल, असेही कटके यांनी या वेळी सांगितले. 

युवा सेनेचे शहर अधिकारी सुनील जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शिवसेनेचे शहर संघटक राजेंद्र शिंदे यांनी आभार मानले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com