अख्खं कुटुंब क्वारंटाइन...ग्रामस्थांनीही अंतर राखले...पण, आजीच्या अंत्यविधीसाठी खाकी वर्दी धावली   

मोठा बाका प्रसंग उभा राहिलेला.
Sangvi's grandmother, who died due to corona, was cremated by the police
Sangvi's grandmother, who died due to corona, was cremated by the police

करकंब (जि. सोलापूर) : कुटुंबातील सर्व सदस्यांना कोरोनाची लागण झालेली. त्यांच्यावर विलगीकरण कक्षात उपचार सुरू होते. मात्र, घरात एकटीच असलेल्या साठ वर्षीय आजीचा घरातच कोरोनामुळे मृत्यू झाला. गावातील लोकही भीतीमुळे त्या आजीजवळ जायला धजावत नव्हते. गावच्या पोलिस पाटलांनी करकंब पोलिस ठाण्याला याबाबतची माहिती दिली. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी चोवीस तास रस्त्यावर उभे राहून नागरिकांची काळजी घेणारी खाकी वर्दी पुन्हा मदतीला धावून आली आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या आजीवर अंत्यसंस्कार केले.
    
ही ह्‌द्‌य हेलावून टाकणारी घटना आहे पंढरपूर तालुक्यातील सांगवी गावची. आयुष्याच्या शेवटी मुलंबाळं जवळ नसताना मृत्युमुखी पडलेल्या आजीचे नाव मगन बोंगाणे असे आहे. 

सांगवीतील अख्खं बोंगाणे कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली आहे. ते संपूर्ण कुटुंब सध्या पंढरपूर येथे विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल झालेले आहे. इकडे गावात एकटी असलेल्या मगन बोंगणे यांचे कोरोनामुळे मृत्यू झाला. घरातील सर्वजण पंढरपुरात उपचार घेत असल्याने आजीच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला. गावातील लोकही भीतीमुळे पुढे येईनात. मोठा बाका प्रसंग उभा राहिलेला. अशावेळी गावचे पोलिस पाटलांनी याबाबतची हकिकत करकंब पोलिस ठाण्यात दिली.

याबाबतची माहिती मिळताच करकंब पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश मुंडे, सिरमा गोडसे, अमोल घुगे आदींनी पुढाकार घेऊन घटनास्थळी धाव घेतली. कोरोनाच्या धास्तीने अंत्यविधीसाठी कोणीही पुढे येत नसल्याने त्यांनी अगन बोंगाणे या आजीच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. आजीचे जवळच्या नातेवाईकांना बोलावून घेतले आणि त्यांच्या उपस्थितीत सर्व सोपस्कार पार पाडत स्वतःच आजीचा अंत्यविधी उरकला.

एकीकडे रस्त्यावर उभे राहून नागरिकांच्या सुरक्षेचे काळजी घेणारे पोलिस शेवटच्या विधीसाठी धावून येत असल्याचे जागोजागी दिसत आहे.  कोरोना महामारीमुळे रक्ताची नातीही दुरावत चाललेली असताना खाकी वर्दीतील ही माणुसकी मात्र उठून दिसत आहे. 

नागरिकांनी आतातरी जबाबदारी ओळखावी

कोरोना विषाणुमुळे सध्याची परिस्थिती अतिशय भयानक बनली आहे. एकीकडे रेमडेसिव्हिर इंजेक्शन, लस, आणि ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. दुसरीकडे बाधित झालेल्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचेही प्रमाण वाढत आहे. अशा शेवटच्या क्षणी आप्तस्वकीयही जवळ नसणे, हे खूपच वेदनादायी आहे. अशा परिस्थितीत पोलिस सर्वच पातळ्यांवर जीवाची बाजी लावून काम करत आहेत. नागरिकांनीही आता तरी स्वतःची जबाबदारी ओळखून सर्वतोपरी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करकंब पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील यांनी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com