मंगळवेढा (जि. सोलापूर) : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक आणि उमेदवार याबाबत दोन्ही तालुक्यात दिवसेंदिवस उत्सुकता वाढत आहे. एकीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांच्या नावाची चर्चा आहे. दुसरीकडे आमदार प्रशांत परिचारक यांच्या रुपाने भारतीय जनता पक्षाकडेही तगडा उमेदवार आहे. असे असूनही या दोन्ही पक्षाकडून विविध पातळीवर चाचपणी सुरू आहे, त्यामुळेच मंगळवेढा तालुक्यातील दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे हे राष्ट्रवादी की भाजपच्या गळाला लागणार? याची उत्सुकता मतदारसंघात शिगेला पोचली आहे.
आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे या मतदारसंघातील रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे, तसे सूतोवाच भारत भालके यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विरोधातील उमेदवार कोण याची चर्चा मतदारसंघामध्ये जोर धरत आहे.
यामध्ये प्रामुख्याने परिचारक कुटुंबातील कोण असणार की दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे उमेदवार असणार याविषयीची चर्चा जोर धरत आहे. दुसरीकडे युटोपियन कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनीदेखील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सोलापुरातील कार्यक्रमाला हजेरी लावल्यामुळे त्यांची भूमिका काय असणार? याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहे.
दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवून जवळपास 55 हजार मते घेतली होती. उमेदवारीसाठी त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी जवळीक साधावी, अशी भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे, त्यामुळे उमेदवारीसाठी ते कोणत्या पक्षाशी जवळीक साधतात, याकडे त्यांचा समर्थकांसह तालुक्याचे लक्ष असणार आहे.
उमेदवारी आणि त्यासंदर्भाने होणाऱ्या चर्चेबाबत समाधान आवताडे म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपचे वरिष्ठ नेते आपल्या संपर्कात आहेत. तशा स्वरूपात प्राथमिक बैठकही झाली आहे, त्यामुळे तळागाळातील कार्यकर्ते, मतदार व इतरांशी चर्चा करून याबाबत लवकरच आपला निर्णय जाहीर करणार आहे.
मंगळवेढा तालुक्यामध्ये दामाजी साखर कारखान्यासह, विविध सहकारी संस्था, निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींवर आवताडे गटाचे वर्चस्व आहे. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बऱ्यापैकी प्राबल्य असल्यामुळे त्यांना मानणारा वर्ग तालुक्यात आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत पंढरपूर तालुक्यातही आवताडे गटाचे काही सदस्य निवडून आले आहेत. शिवाय तेथील वाढता संपर्क पाहता आवताडे समर्थकांचा आत्मविश्वास वाढू लागला आहे. ते विधानसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार असणार हे निश्चित असले तरी पक्ष कोणता याची मात्र समर्थकांसह तालुक्याला उत्सुकता आहे.

