पंढरपूरच्या आखाड्यात आवताडे बंधूंचे एकमेकांना आव्हान; पोटनिवडणुकीमुळे परिवारात फूट

विधानसभेच्या पोटनिवडणुकीमुळे या परिवाराच्या ऐकीला गालबोट लागले.
Samadhan Avtade challenged by cousin Siddheshwar Avtade in Pandharpur by-election
Samadhan Avtade challenged by cousin Siddheshwar Avtade in Pandharpur by-election

मंगळवेढा (जि. सोलापूर) : महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या आखाड्यात अखेर संत दामाजी सहकारी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे आणि मंगळवेढा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे हे चुलत बंधू एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे भगिरथ भालके यांना होणार असला तरी पंढरपूर तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार जादा मते घेणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागणार आहे.  

मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात आवताडे गटाने कोणताही राजकीय वारसा नसताना शून्यातून राजकीय वाटचाल करत विकास सोसायटी, ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, खरेदी-विक्री संघ, कृषी उद्योग संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती व संत दामाजी कारखाना, जिल्हा मध्यवर्ती बॅंक या तालुक्यातील संस्थांवर आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. हे वर्चस्व मिळविताना आवताडे परिवार या नावाने तालुक्याबरोबर जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा निर्माण केला होता. पण, विधानसभेच्या पोटनिवडणुकीमुळे या परिवाराच्या ऐकीला गालबोट लागले. 

तरुणाईची साद

गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढलेले समाधान आवताडे यांना पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जवळ करत उमेदवारी दिली. गेल्या वेळी पन्नास हजारांपेक्षा अधिक मतदान घेतलेल्या आवताडे गटाला परिचारक गटाचे पाठबळ देत भाजपने आपला गट भक्कम केला. मात्र, त्याला खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांनी तरुणाईची साद आपल्याला असल्याचे सांगत उमेदवारी अर्ज दाखल करून आव्हान दिले. 

भोसले यांचा अर्ज मागे; आवताडेंचा कायम

या आखाड्यातील पंढरपूरचे नागेश भोसले यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी परिचारकांची मधस्थी कामी आली. मात्र, सिद्धेश्वर आवताडे यांचा अर्ज मागे घेण्यासाठी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांची शिष्टाईही कामी आली नाही. त्यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बबनराव आवताडे यांच्याबरोबर चर्चा करूनही त्याला यश आले नाही. त्यामुळे हे दोघे चुलत बंधू एकमेकाच्या समोर उभे ठाकले आहेत. 

कोणता झेंडा घेऊ हाती

महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे भगिरथ भालके यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी शिवसेनेच्या माहिला आघाडीच्या प्रमुख शैला गोडसे यांनी अपक्ष,तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे यांनीही अर्ज दाखल केला आहे. आतापर्यंत एकसंघ असलेल्या आवताडे परिवारातील कार्यकर्त्यांना मात्र, आता कोणाचा झेंडा हाती धरावा, याचे कोडे पडले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांमध्ये  काम करण्याची संधी मिळालेल्या नेत्यांनादेखील प्रचार करण्यासाठी अडचणीचे वाटू लागले आहे. भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्यासाठी सिद्धेश्वर आवताडे यांची उमेदवारी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. 

कार्यकर्त्यांचे चेहरे पडले

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भालके यांनाही अपक्ष उमेदवार शैला गोडसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे हे जादा मते घेणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागणार आहे. ऐन उन्हाळ्यात होत असलेल्या निवडणुकीत उमेदवारांबरोबरच कार्यकर्त्यांचादेखील घाम निघणार आहे. दोन बंधू एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागातील आवताडे यांच्या कार्यकर्त्यांचे चेहरे मात्र पडले आहेत

शनिवारी दिवसभर जिल्ह्याबरोबच राज्यातील कार्यकर्तेही फोन करून सिद्धेश्वर आवताडे यांच्या उमेदवारीचे काय झालं. त्यांनी अर्ज मागे घेतलाय की ठेवलाय, याची विचारणा केली जात होती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com