प्रशांत परिचारकांनी सांगितले समाधान आवताडेंना पाठिंबा देण्यामागचे कारण 

एकच वादा; समाधान दादा, तुम आगे बढो असे म्हणून चालणार नाही.
Prashant Paricharan said the reason for supporting Samadhan Avtade
Prashant Paricharan said the reason for supporting Samadhan Avtade

मंगळवेढा (जि. सोलापूर) : ‘‘विरोधी उमेदवाराच्या (राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार भारत भालके) विरोधात असणारी मते ही जवळपास दीड लाख आहेत. म्हणून, आम्ही  दोघे (प्रशांत पारिचारक आणि समाधान आवताडे) स्वतंत्र लढून मतविभागणी करण्यापेक्षा मी उभारलो, तर आवताडेंनी मला मदत करायची आणि आवताडे उभारले तर मी त्यांना मदत करायची, अशा भूमिकेतून आम्ही मतविभागणी टाळण्यासाठी एकत्र आलो आहोत,’’ अशा शब्दांत आमदार प्रशांत परिचारक यांनी आवताडे यांना पाठिंबा देण्यामागची खेळी उघड केली. 

भारतीय जनता पक्षाचे पंढरपूर पोटनिवडणुकीचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील सिद्धेश्वर मंदिरात करण्यात आला. त्यावेळी आमदार परिचारक बोलत होते. या वेळी उमेदवार समाधान आवताडे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शशिकांत चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सोमनाथ आवताडे, माजी सभापती प्रदीप खांडेकर, संचालक सचिन शिवशरण आदी उपस्थित होते.

यूपीए सरकारच्या काळात केंद्रात दहा वर्षे कृषीमंत्री असलेल्या शरद पवारांनी साखरेची विक्री किंमत कधी 3100 रुपये ठरविली नाही. मात्र, नरेंद्र मोदी सरकारच्या काळात सरकारच्या तिजोरीवर बोजा न पडता साखरेची विक्री किंमत 3100 रुपयांच्या खाली येऊ न देण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचा दर मिळाला, असेही आमदार परिचारक यांनी सांगितले.

आमदार परिचारक म्हणाले की, पूर्वीच्या काळी युरियासाठी दुकानासमोर रांगा लागायच्या. प्रसंगी पोलिस बंदोबस्त पाचारण करावा लागायचा; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गैरमार्गाने दारूधंद्यांकडे जाणारा एरिया बंद केल्यामुळे आज शेतकऱ्यांची युरियाबद्दलची कधीही तक्रार आपण ऐकली नाही. परदेशात फिरताना तिथले रस्ते पाहिल्यानंतर आपल्या देशात असे रस्ते कधी व्हायचे, असा प्रश्न निर्माण व्हायचा. पण, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील सर्व ठिकाणच्या रस्त्यासाठी तीन लाख कोटींची तरतूद करून रस्त्यांची निर्मिती केली, त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांनीदेखील आपली जमीन महामार्गासाठी देण्याची भूमिका बजावली, त्यातून शेतकऱ्यांना योग्य मोबदलादेखील मिळाला.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून 2 लाख कामे केली आहेत. विरोधकांच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात 35 गावांना पाणी आले नाही. एमआयडीसी उभारली नाही, उलट ते सांगतात आमच्याकडे विचारांचा वारसा आहे. आम्ही मात्र विकासाचा वारसा घेऊन लोकांसमोर चाललो आहे. एकच वादा; समाधान दादा, तुम आगे बढो असे म्हणून चालणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी केलेल्या कामाची माहिती प्रत्येक मतदारासमोर पोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेण्याचे आवाहन आमदार परिचारक यांनी या वेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com