प्रशांत परिचारकांनी पोटनिवडणुकीतून पुन्हा दाखवली समविचारी परिवाराची ताकद - Prashant Paricharak reaffirms strength of samvichari parivar in by-elections | Politics Marathi News - Sarkarnama

प्रशांत परिचारकांनी पोटनिवडणुकीतून पुन्हा दाखवली समविचारी परिवाराची ताकद

हुकूम मुलाणी
सोमवार, 10 मे 2021

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यात सध्या समविचारीचा बोलबाला मात्र पोटनिवडणुकीनंतरही कायम राहिला आहे.

मंगळवेढा (जि. सोलापूर) : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसला (Nationalist Congress) विशेषतः मोहिते पाटील (Mohite Patil) यांचे राजकीय वर्चस्व कमी करण्यासाठी तयार झालेल्या समविचारी परिवाराने पोटनिवडणुकीच्या निकालाने जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा वर्चस्व दाखवून दिले आहे. या समविचारी नेत्यांमध्ये आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak)यांची भूमिका मात्र सर्वच निवडणुका आणि निवडींमध्ये निर्णायक ठरलेली आहे. समविचारी परिवारामध्ये (samvichari parivar) भाजपच्या(BJP)आणखी एका आमदाराची भर पडली आहे.

विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार संजय शिंदे यांनी जिल्ह्याच्या राजकारणातून राष्ट्रवादीला विशेषतः मोहिते पाटील यांना बाजूला करण्यासाठी राष्ट्रवादीच्या विरोधात  असलेल्या जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील राजकीय नेत्यांची एकत्रित मोट बांधली. या आघाडीने 2015 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक साळुंखे यांना परिचारक यांनी पराभूत करत राष्ट्रवादीला पहिला धक्का दिला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीमध्येही तोच पॅटर्न राबविण्यात आला. जिल्ह्याच्या राजकारणात अनपेक्षितरित्या पुढे आलेल्या समविचारी परिवाराचा दबदबा वाढू लागला.

हेही वाचा : शरद पवारांचे पहिले मुख्यमंत्रिपद...आणि संभाजीराव काकडे.... 

या समविचारी परिवाराच्या बहुतांश नेत्यांनी मागील सरकारच्या काळात भाजप नेत्यांशी जवळीक साधली. त्यातून त्यांनी आपापल्या मतदारसंघातील प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पक्षाचे सोलापूर शहरातील आमदार आणि तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा या आघाडीला उघड पाठिंबा होता. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेतेदेखील त्या समविचारी परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.  त्यातच 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातदेखील समविचारी नेत्याने भाजपला साथ दिली. समविचारी परिवारातील बहुतांश नेत्यांना2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदारकीची लॉटरी लागली. त्यामध्ये संजय शिंदे, राजेंद्र राऊत, शहाजीबापू पाटील यांचा समावेश आहे. संजय शिंदे यांनी तर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही याच परिवाराच्या माध्यमातून मिळविले. त्याच्या जोरावर त्यांनी करमाळ्याची आमदारकी पटकावली. 

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मागासवर्गीयसाठी आरक्षित झाले. महाविकास आघाडी सरकार राज्यात आले होते, त्या माध्यमातून तसेच बहुमत पाठीशी असल्याने  अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता होती. मात्र, समविचारी परिवाराच्या नेत्यांनी एकत्र येऊन जिल्हा परिषदेची सत्ता पुन्हा समविचारीच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले. या ठिकाणी मात्र मोहिते पाटील यांची भूमिका बदलेली दिसली. कारण त्यांनी समविचारी परिवाराच्या उमेदवाराला अनुकूल ठरेल, अशी भूमिका घेतली.

दरम्यान, भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे रिक्त जागी झालेल्या निवडणुकीसाठी समविचारीमधील समाधान आवताडे यांना भारतीय जनता पक्षाने संधी दिली. समविचारीतील आमदार संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे समविचारी परिवारामध्ये फूट पडली की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच आवताडे यांना आमदार करण्यासाठी आमदार परिचारक यांनी मोठे कष्ट घेतले. त्यामुळे समविचारीमधील आणखी एका नेत्याला आमदारकीची संधी मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यात सध्या समविचारीचा बोलबाला मात्र पोटनिवडणुकीनंतरही कायम राहिला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख