पंढरीच्या आखाड्यात नेत्यांची जुगलबंदी रंगली अन्‌ जनतेचे प्रश्न हवेत विरले!

भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख व राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे हे दोघेही सांगोल्याचे असून ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
The original questions in the constituency disappeared from the Pandharpur by-election campaign
The original questions in the constituency disappeared from the Pandharpur by-election campaign

मंगळवेढा (जि. सोलापूर)  ः पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा आखडा आता चांगलाच तापू लागला आहे. प्रचारसभेसाठी मतदारसंघाच्या बाहेरून येणारे राजकीय नेते वैयक्तीक उणीदुणी पंढरीच्या प्रचारसभांच्या आखाड्यात काढू लागल्यामुळे सर्वसामान्यांची करमणूक होत असली तरी मतदारसंघाच्या मूळ प्रश्नाकडे सोयीस्कररीत्या बगल दिली जात आहे. असा सूर मतदारसंघातून निघू लागला आहे.
 
महाविकास आघाडीच्या माध्यमातून पंढरपूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देत भगिरथ भालके यांना उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, आमदार संजय शिंदे, दीपक साळुंखे, उमेदवार भगिरथ भालके यांच्यासह काँग्रेस, शिवसेनेचे नेते सक्रिय झाले आहेत. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांना संधी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी आतापर्यंत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे सहभागी झाले आहेत. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन शिंदे यांच्या प्रचारासाठी रविकांत तुपकर आणि माजी खासदार राजू शेट्टी हे सहभागी झाले. अपक्ष उमेदवार असलेल्या शैला गोडसे यांच्या प्रचारामध्ये जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख सहभागी झाले आहेत. मात्र, त्यांचा मुद्दा हा मतदारसंघातील प्रलंबित विकास कामाच्या संदर्भात आहे. मात्र, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी मात्र त्यांच्या वैयक्तिक मतदारसंघातील उणीदुणी पंढरीच्या आखाड्यात काढली जात आहेत.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पाणी चोरीच्या आरोपावरून टीकास्त्र सोडले, तर राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांनी त्यांचे पारंपरिक विरोधक मोहिते-पाटील यांच्यावर निशाणा साधला. आमदार संजय शिंदे यांनी ‘लोकसभेत माझी लयं जणांनी मज्जा केली, त्याचे उट्टे काढण्यासाठी येत असल्याचे सांगितले. 

भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख व राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे हे दोघेही सांगोल्याचे असून ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आमदार प्रशांत परिचारक हे विरोधक भालके कुटुंबावर टीका करत आहेत. भगिरथ भालकेंकडूनही आवताडे, परिचारक यांना टार्गेट केले जात आहे. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे प्रचार सभेत बोलताना माजी मंत्री आणि इंदापूर तालुक्यातील कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटील यांचा समाचार घेतात, तर पाटीलही सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतात. मोहिते-पाटील यांनीदेखील पाणी प्रश्नावरून विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यांचे विरोधक सदाभाऊ खोत यांचे यांच्यावर नाव न घेता टीका केली. काही सुसंस्कृत राजकीय नेत्यांकडून असंस्कृत शब्दांत टीका सुरू आहे त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक टीकेतून कोरोनाच्या वाढत्या संकटात करमणूक होत असली तरी या मतदारसंघात भेडसावणाऱ्या मूळ समस्येकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com