शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घातले लक्ष 

रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.
NCP leaders pay attention to Shiv Sena's stronghold
NCP leaders pay attention to Shiv Sena's stronghold

रत्नागिरी : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात धडक देणारी राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत आल्यामुळे पक्षवाढीसाठी सरसावली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नुकत्याच झालेल्या जिल्हा दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. पक्षवाढीसाठी बळ मिळावे, अशी मागणी प्रत्येक तालुक्‍याच्या बैठकीत झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याला सक्षम नेतृत्व मिळेल, अशी आशा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. 

रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच ठिकाणी राष्ट्रवादीने पाय रोवत तीन मतदारसंघांवर प्रभुत्व निर्माण केले. भास्कर जाधव, उदय सामंत, संजय कदम यांच्या तगड्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद, पंचायत समितींसह ग्रामपंचायतींमध्येही धडक मारली; परंतु जाधव, सामंतांनी पक्ष बदल केले आणि सक्षम नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. नेते गेले तरी कार्यकर्ता स्थिर आहे. पण, सक्षम नेतृत्वाअभावी कार्यकर्ते अस्थिर आहेत. 

मागील विधानसभा निवडणुकीत चिपळूणातून शेखर निकम, तर लोकसभेला जिल्ह्याच्या उत्तर भागातून सुनील तटकरे निवडून आले. राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीने कोकणातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी दौरे सुरू केले आहेत. काही दिवसांपूर्वी खेड-दापोलीमध्ये खासदार तटकरे यांनी आढावा बैठका घेत माजी आमदार संजय कदम यांना बळ देण्यासाठी पावले उचलली होती. त्यांच्या या कृत्यामुळे आमदार योगेश कदम यांनी टोकाची भूमिका घेत हक्‍कभंगाचा प्रस्ताव दाखल केला. महाविकास आघाडी असल्याने दोन्ही पक्षात समन्वय नसल्याचे आढळून आले आहे. 

या प्रकारात हस्तक्षेप न करता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तटकरेंची बाजू उचलून धरली. त्यामुळे राष्ट्रवादी समन्वयाची भूमिका घेतानाच पक्ष कार्यकर्ते दुखावणार नाहीत, याची काळजी घेत आहे. चिपळूण, संगमेश्‍वर तालुक्‍यात शेखर निकम प्रभावीपणे काम करत आहेत. गुहागरमध्ये राष्ट्रवादीच्या मुशीत वाढलेले आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे मोठे आव्हान आहे. कार्यकर्त्यांना स्थिर ठेवण्यासाठी तेथील कट्‌टर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याची गरज आहे. तीच परिस्थिती रत्नागिरी, लांजा व राजापूर तालुक्‍यात आहे. रत्नागिरीत उदय सामंत यांचे तगडे आव्हान आहे. 

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी प्रत्येक तालुक्‍यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. संघटना वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ दिले जावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. एखाद्या गावात पदाधिकारी म्हणून गेलो, तर तेथील विकासकामे करण्यासाठी त्यांना काय देणार? हा प्रश्‍न आम्हाला पडतो, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या दौऱ्याला लाभलेला प्रतिसाद पाहता सक्षम नेतृत्वाची गरज अधोरेखित झाली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com