पंढरपूर पोटनिवडणुकीची जबाबदारी खांद्यावर येताच पालकमंत्री भरणे लागले कामाला 

त्याचा मनात राग धरून काहीही करायचा उद्योग करू नका.
The NCP has handed over the responsibility of Pandharpur by-election to Dattatreya Bharane
The NCP has handed over the responsibility of Pandharpur by-election to Dattatreya Bharane

मंगळवेढा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर होणाऱ्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची जबाबदारी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या पालकत्वाबरोबर पोटनिवडणुकीचे पालकत्वही भरणे यांच्याकडे आल्याने त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. 

पोटनिवडणुकीसाठी बुधवारपासून (ता. 24 मार्च) अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील उमेवारीवरून सुरू असलेली धुसफूस शांत करण्यासाठी तसेच, मतदारसंघातील पक्ष कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे पंढरपूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी प्रत्येकी दहा कार्यकर्त्यांना एका स्वतंत्र खोलीत बोलावून त्यांचे मत जाणून घेतले. त्यामध्ये काही कार्यकर्त्यांची 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कमी मते पडल्यावरून कानउघडणीदेखील करण्यात आली. 

त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीची जबाबदारी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे देण्यात आली आहे. मंत्रालयातील एक-दोन बैठका वगळता त्यांना या निवडणुकीत लक्ष घालण्यास सांगितले आहे. प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व मी स्वतः सहभागी होणार असल्याचे सूतोवाच त्यांनी या वेळी बोलताना केले. 

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आलेले सोलापूरचे पालकमंत्री भरणे यांच्या नेतृत्वाचा या निवडणुकीत कस लागणार आहे. जबाबदारी येताच भरणे हेही कामाला लागले आहेत. त्यांनी त्याच दिवशी पंढरपूर शहरात धनगर समाजाची बैठक घेतली. या बैठकीत मतदारसंघात धनगर समाज निर्णायक असतानाही धनगर समाजातील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी समाजाच्या अधोगतीस राष्ट्रवादी जबाबदार असल्याचे सूतोवाच केले. सांगोल्याचे शेकापचे उमेदवार अनिकेत देशमुख यांचा पराभव हा देखील राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म मोडल्याने झाला, तर तालुका व जिल्हा राष्ट्रवादीच्या कार्यकारणीत धनगर समाजाला अपेक्षित स्थान मिळत नसल्याची तक्रार पालकमंत्री भरणे यांच्याकडे केली. 

याबाबत पालकमंत्री भरणे म्हणाले की, भालके यांच्याविषयी मतदारसंघात सहानुभूती आहे, त्यामुळे समाजातील कार्यकर्त्यांनी कोणीतरी सांगते; म्हणून भडकू नये. परिस्थिती बघून निर्णय घ्यावा. मागील सरकारच्या काळात शेळी-मेंढी पालन महामंडळाला निधीची तरतूद केली नव्हती. मी स्वतः यात लक्ष घालून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आग्रह करून 100 कोटींची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. तुमच्या मागण्या काय आहेत, त्या मला सांगा. त्या मागण्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करतो; परंतु कुणीतरी कायतरी सांगते, त्याचा मनात राग धरून काहीही करायचा उद्योग करू नका, अशा सूचना देऊन भरणे यांनी धनगर समाजातील कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. 

भरणे यांच्या भाषणावरून त्यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत हालचाली सुरू केल्या आहेत. या मतदारसंघात धनगर समाजाचे मतदारही निर्णायक आहेत. त्यामुळे ती मते आपल्या पदरात पाडून घेण्याच्या दृष्टीने दुरंगी लढत झाल्यास भाजपकडून आमदार झालेले गोपीचंद पडळकर व पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या नेतृत्वाचा या मतदारसंघात कस लागणार, हे मात्र यानिमित्ताने निश्‍चित झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com