संपर्क नसल्याचा आरोप असणाऱ्या खासदारांनी साधला जनतेशी संवाद  - The MPs, who were accused of not having contact, interacted with the public | Politics Marathi News - Sarkarnama

संपर्क नसल्याचा आरोप असणाऱ्या खासदारांनी साधला जनतेशी संवाद 

हुकूम मुलाणी 
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

सोलापूर मतदार संघात संपर्क ठेवण्यास कमी पडल्याचा आरोप खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांच्यावर विरोधकांकडून केला जात आहे.

मंगळवेढा : सोलापूर मतदार संघात संपर्क ठेवण्यास कमी पडल्याचा आरोप खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांच्यावर विरोधकांकडून केला जात आहे. मात्र, चालू ऑक्‍टोबर महिन्यात तीनवेळा पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचा दौरा करून मतदारांशी संपर्क साधून तो आरोप त्यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा या ना त्या कारणामुळे सतत चर्चेत राहिला. त्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यापासून शरद बनसोडे यांच्या निवडून येण्यापर्यंतची चर्चा होत राहिली. शिंदे यांच्यासारखे प्रभावी नेतृत्व मतदारसंघाला लाभले. तरीही विकासाच्या मुद्यावरून त्यांच्यावर टिका होत राहिली. लोकसभेच्या 2009 मधील निवडणुकीत 35 गावांच्या पाणी प्रश्नावरून 22 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा घेतलेला निर्णय गाजला होता. त्यानंतर खासदार शरद बनसोडेंनी हा प्रश्न लोकसभेत मांडला. पण, पाठपुरावा करण्यास कमी पडले. प्रचारालाही न गेलेल्या गावाला मात्र आगामी काळात भेटी देत खासदार निधी देण्यात ते यशस्वी ठरले होते. त्यांच्याही काळात पंढरपूर मतदारसंघात कमी संपर्काची ओरड होतीच. 

बनसोडे यांचा पत्ता कट करून भाजपने सोलापुरातून डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना संधी दिली. वास्तविक पाहता त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून वेगळा सूर उमटला होता. त्यांच्या विरोधातील प्रचारसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महास्वामींवर टीकास्त्र सोडताना महाराजांचे काम मठात असते इथे (निवडणुकीत) काय काम? असा आरोप केला. विजयानंतर काही दिवसांनी जात प्रमाण पत्रावरून ते चर्चेत राहिले. 

मतदारसंघात संपर्क ठेवत नसल्याचा आरोप होत असतानाच पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात खासदार शिवाचार्य यांनी एकाच महिन्यात तीन वेळा भेट दिली आहे. पहिला दौरा त्यांनी नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या पाहणीसंदर्भात केला. त्या वेळी माचनूर चौकात बोगदा करण्याची मागणी ग्रामस्थांनी जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्याकडे केली. त्यावेळी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन त्यांचा विषय मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर त्यांनी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्‍यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला.

तसेच, दोन दिवसांपूर्वी त्यांनी मंगळवेढ्यातील भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयात जनता दरबार आयोजित करून शहर व तालुक्‍यातील 140 नागरिकांच्या तक्रारींचे निवेदन स्वीकारले. त्या मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. आगामी काळात दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी खासदारांचा जनता दरबार आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी दिली. 

संपर्कात नाही म्हणणारे खासदार आता पुन्हा लोकांशी संपर्क साधू लागल्याने खासदारांशी संबंधित प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. पण, त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे आवश्‍यक आहे. पंतप्रधान पीकविमायोजनेतील त्रुटीचा विषय असो अथवा रखडलेला पंढरपूर-विजयपूर रेल्वेचा प्रश्न सोडविण्यासाठी खासदार शिवाचार्य ताकदीने प्रयत्न करणार का? याकडे दोन्ही तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख