आवताडेंच्या विजयासाठी झटणाऱ्या रणजितसिंहांना कोरोना; क्वारंटाइन कोण कोण होणार? - MLA Ranjit Singh Mohite Patil's corona test positive | Politics Marathi News - Sarkarnama

आवताडेंच्या विजयासाठी झटणाऱ्या रणजितसिंहांना कोरोना; क्वारंटाइन कोण कोण होणार?

हुकूम मुलाणी
बुधवार, 7 एप्रिल 2021

त्यांच्याबरेाबर प्रचारसभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापासून सर्व नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

मंगळवेढा (जि. सोलापूर)  ः पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी आलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यांनी मंगळवेढा शहरासह तालुक्यातील 10 गावांत प्रचारसभा घेतल्या आहेत. पोटनिवडणुकीनंतर तालुक्यात कोरोनाचा विस्फोट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणा सतर्क राहण्याची गरज आहे.

मंगळेवढा तालुक्यात सध्या एकच कोविड सेंटर असून त्या ठिकाणी केवळ ४० रुग्णांवर उपचाराची सोय आहे. तालुक्यात दुसरे कोविड सेंटर नसल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांना  सांगोला, पंढरपूर व सोलापूरला जावे लागत आहे. सध्याची निवडणूक आणि त्यातील प्रचारसभांना होणारी गर्दी तसेच महत्वाच्या नेत्यांच्या आगामी सभांचे नियोज पाहता प्रशासनाने तातडीने रुग्णालयाची निर्मिती करण्याची आवश्यकता आहे. 

मोहिते पाटलांच्या सभांना ब्रेक

मंगळवेढा तालुक्यामध्ये सध्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा धुरळा उडला आहे. भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी समाधान आवताडे यांना विजयी करायचेच, या भूमिकेतून आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी माघार घ्यावी म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांच्या समवेत बबनराव आवताडे यांच्यासोबत बैठक घेतली होती. तसेच, त्यांच्याबरेाबर प्रचारसभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापासून सर्व नेते व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे आता क्वारंटाईन कोण कोण होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

तपासणी करून घेण्याचे आवाहन

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आसबेवाडी, सलगर खुर्द, शिवनगी, महमदाबाद हु, पडोळकरवाडी, मानेवाडी, हुन्नूर, हुलजंती, सोड्डी, मरवडे या ठिकाणी प्रचार सभा घेतल्या आहेत. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य यंत्रणेने चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

सोशल डिस्टन्सिंगचे उल्लघंन

मंगळवेढा शहरातील व्यापाऱ्यांनी पूर्णपणे बंद पाळला असला तरी शहरालगत असलेल्या चोखामेळा नगर, दामाजी नगर येथील दुकाने सुरू आहेत. रस्‍त्‍यावर भाजीपाला विक्रीचे दुकाने ठेवल्यामुळे त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. त्यामुळे नियमांचे पालन फक्त शहरातील व्यापाऱ्यांनी करायचे का, असा सवाल या निमित्ताने त्यांच्याकडून केला जात आहे. 

आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची गरज

सध्या प्रचाराच्या निमित्ताने तालुक्यामध्ये राजकीय धुरळा निघत आहे. अशा परिस्थितीत निवडणूक संपल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते, त्यादृष्टीने तालुक्यातील आरोग्य व्यवस्था आणखी सक्षम करण्याची आवश्यकता आहे; अन्यथा सर्वसामान्यांना कोरोनाचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही

व्यापारी पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत 

प्रशासनाने नियमाचे भीती दाखवत मंगळवेढा शहर लॉकडाऊन केले आहे; परंतु हाकेच्या अंतरावर कोरोना नियमांचे पालन होत नसल्यामुळे त्या ठिकाणी रूग्ण सापडत आहेत शहरात रुग्ण नसतानादेखील शहरवासीयांना प्रशासन कोवीड चाचणीचा आग्रह धरत आहे. प्रचारातील नेत्यांना तो नियम नाही का, असा सवाल शहरातील व्यापारी महासंघ या व्हाट्स अप ग्रुपवर विचारला जात आहे. प्रशासनाने व्यापाऱ्यांना दिलासा न दिल्यास पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची चर्चही या ग्रुपवर सुरू आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख