सोपलांच्या सांगण्यावरून वेठीस धराल, तर तुमच्या संस्थांमधील भ्रष्टाचार उघड करू

आम्हाला हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालय नवीन नाही. ते आमच्या पाचवीलाच पुंजलेले आहे.
MLA Rajendra Raut's challenge to Co-operation Minister Balasaheb Patil
MLA Rajendra Raut's challenge to Co-operation Minister Balasaheb Patil

बार्शी (जि. सोलापूर) : "मित्राच्या (माजी मंत्री दिलीप सोपल) खोट्या तक्रारीच्या आधारे माहिती न घेता जाणीवपूर्वक जर बार्शी बाजार समितीला कुणी टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असेल. चौकशा लावून विनाकारण समितीला वेठीला धरण्याचा प्रकार होत असेल तर जशास तसे उत्तर दिले जाईल,'' असा इशारा आमदार राजेंद्र राऊत यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना दिला. 

दरम्यान, सहकारमंत्री पाटील यांनी त्यांच्या कऱ्हाड मतदारसंघात कशा पद्धतीने शैक्षणिक संस्था, साखर कारखाने लाटले आहेत. त्यांच्या या संस्थांमध्ये कसा गैरप्रकार सुरू आहे. त्याची माहिती मी घेत आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत सहकारमंत्र्यांच्या संस्थांमधील अनागोंदी कारभाराची माहिती जमा होईल. त्याबाबत उच्च न्यायालयात मी याचिका दाखल करेन. मित्राच्या सांगण्यावरून मंत्रिपदाचा दुरुपयोग केला, तर जशास तसे उत्तर दिले जाईल. तसेच पाटील यांनी केलेला भ्रष्टाचार लवकरच राज्याच्या निदर्शनास आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असेही राऊत यांनी सहकारमंत्र्यांना आव्हान दिले. 

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे वाटपावरून आमदार राऊत आणि माजी मंत्री सोपल यांच्या कलगीतुरा रंगला आहे. सोपल यांनी तक्रारींचा पाढा वाचल्यानेच सहकारमंत्री पाटील यांनी बार्शी बाजार समितीची चौकशी सुरू केली आहे, असा आरोप राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. 

ते म्हणाले, "माजी मंत्री सोपल यांनी बार्शी बाजार समितीवर आरोप करणे निषेधार्ह आहे. बाजार समितीचे कामकाज अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे. हे संपूर्ण बार्शी तालुका आणि सोलापूर जिल्हा बघत असून सर्व शासकीय यंत्रणांना माहीत आहे. या अगोदरही विरोधकांकडून बाजार समितीबाबत तक्रारी देण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे बाजार समितीची तीन वेळा चौकशी झाली. या तीनही चौकशीत काहीही निष्पन्न झाले नाही. चौथी चौकशी सध्या सुरू असून ती लवकरच पूर्ण होईल. त्यात काय येतंय, याची आम्ही वाट पाहणार आहोत. त्या अगोदरच आता पाचवी चौकशी नेमली आहे. बाजार समितीचा 2019-2020 या वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल आला आहे. तरीही एक विशेष लेखा परीक्षक सहकार मंत्र्यांनी नेमला आहे.'' 

"सहकार मंत्री पाटील यांना मी मधल्या काळात भेटलो आहे. बार्शी तालुक्‍यातील राजकारण हे व्यक्तीगत वादविवादाचे आणि एकमेकांच्या कुरापती काढण्याचे आहे. तालुक्‍यातील काही लोकांच्या खोट्या तक्रारींच्या आधारे बार्शी बाजार समितीला विनाकारण टार्गेट करू नका, असे सांगितले होते. तसेच, बाजार समितीचे कामकाज कसे चाललेले आहे, हेही सांगितले होते,'' असे राऊत यांनी नमूद केले. 

"त्यानंतर परवा बाळासाहेब पाटलांना फोन केला. त्यांना म्हटलं की बाळासाहेब आमचं बार्शी तालुक्‍यातील आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण आहे. चुकीच्या पद्धतीने बाजार समितीवर आरोप होत आहेत. जर योग्य असेल तर चौकशी करायला किंवा कोणत्याही चौकशीला सामोरे जायला बाजार समिती खंबीर आहे. आम्हाला हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालय नवीन नाही. ते आमच्या पाचवीलाच पुंजलेले आहे. विनाकारण टार्गेट करू नका, अशी मी त्यांना कल्पना दिली आहे,'' असे आमदार राऊत यांनी स्पष्ट केले. 

ते एकत्र तमाशाला जायचे 

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून चौकशीचा असा प्रकार का चालू आहे, याची दोन दिवसांपूर्वी मी कऱ्हाडमधील मित्रांकडून माहिती घेतली. त्या वेळी कळाले की त्यांची (दिलीप सोपल आणि बाळासाहेब पाटील) जुनी मैत्री आहे. ते एकत्र तमाशाला जात होते. खोट्या तक्रारीच्या आधारे माहिती न घेता जाणीवपूर्वक बाजार समितीला कुणी टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असेल तसेच चौकशा लावून बाजार समितीला वेठीला धरण्याचा प्रकार सहकारमंत्री करत असतील आणि द्वेषाचे राजकारण करत असतील तर त्यांना माहीत नाही की राजेंद्र राऊत यांना वयाच्या 13 व्या वर्षापासून कोर्ट-कचेरीची सवय आहे, हे लक्षात असू द्यावे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com