आमदार भालके गटाला एका मतामुळे मिळाली सत्ता; परिचारक-आवताडे गटाच्या पदरी निराशा - MLA Bharat Bhalke's group came to power with one vote | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार भालके गटाला एका मतामुळे मिळाली सत्ता; परिचारक-आवताडे गटाच्या पदरी निराशा

हुकूम मुलाणी
बुधवार, 20 जानेवारी 2021

या निवडणुकीत मोठा उत्कंठावर्धक क्षण प्रभाग क्रमांक दोनमधील मतमोजणीच्या वेळी आला होता.

मंगळवेढा (जि. सोलापूर)  ः एका मताची किंमत काय असते, याचा अनुभव नुकतेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत थोडक्यात मताने पराभूत  झालेले आणि काठावर विजयी झालेल्या उमेदवाराला आली असेल. तोच अनुभव अनुभव मंगळवेढा तालुक्‍यात नुकतेच झालेल्या 23 ग्रामपंचायतीमधील एक असलेल्या भीमा नदीकाठच्या अरळी ग्रामपंचायत निवडणुकीत आला आहे.

आमदार (स्व.) भारत भालके यांचे कट्टर समर्थक तथा मंगळवेढा पंचायत समितीचे सदस्य रमेश भांजे यांचा गटाला केवळ एका मतामुळे ग्रामपंचायतीची सत्ता मिळाली आहे. 

मंगळवेढा तालुक्याच्या ऊस पट्ट्यातील  प्रमुख गावांत अरळीचा समावेश आहे. बागायत क्षेत्रामुळे या भागात उत्पन्नाचे साधन असले तरी गौणखनिजच्या माध्यमातून ग्रामपंचायतला मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. त्यामुळे साहजिकच गावगाड्यातील सत्तेमध्ये आपले वर्चस्व असावे, अशी भावना दोन्ही गटाची असते.

भालके समर्थक म्हणून ओळखले जाणारे पंचायत समितीचे सदस्य रमेश भांजे यांचा राजकीय प्रभाव या भागात मोठ्या प्रमाणात आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भांजे यांचा प्रभाव वारंवार दिसून आलेला आहे. 

दरम्यान, नुकतेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात पंचायत समिती सदस्य रमेश भांजे यांच्या गटाच्या विरोधात श्री दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांचा गट आणि आमदार प्रशांत परिचारक यांचा गट एकत्र येऊन लढत दिली होती. त्यामुळे या निवडणुकीत कोणता गट बाजी मारतो, याची उत्सुकता लागली होती. 

दरम्यान, ग्रामपंचायातीच्या 11 जागांपैकी शारदाबाई भैरगोंडे यांच्या रूपाने एक जागा भांजेला गटाला यापूर्वीच बिनविरोध मिळाली होती. त्यामुळे दहा जागांसाठी मोठ्या चुरशीने निवडणूक झाली. भांजे गटाला आमदार परिचारक व आवताडे समर्थकांनी तुल्यबळ टक्कर दिली. अटीतटीच्या लढतीत दोन्ही गटांना प्रत्येकी 5 जागा मिळाल्या. निवडणुकीपूर्वी बिनविरोध झालेल्या एक जागेचा भांजे गटाला फायदा झाला. त्यामुळे सत्तेसाठी आवश्यक असलेले सहा जागांचे संख्याबळ भांजे गटाला मिळाले. 

या निवडणुकीत मोठा उत्कंठावर्धक क्षण प्रभाग क्रमांक दोनमधील मतमोजणीच्या वेळी आला होता. कारण, या प्रभागातील भांजे गटाच्या उषा भांजे या एकूण 215 मते मिळवून विजयी झाल्या असल्या तरी त्यांच्या विरोधी गटातील उमेदवारालाही 214 मते मिळाली. त्यामुळे केवळ एका मताच्या फरकाने त्या विजयी झाल्या. भांजे गटालाही केवळ एका मतामुळे सत्ता मिळाली आणि विरोधी आवताडे आणि परिचारक गटाला केवळ एका मतामुळे ग्रामपंचायतीची सत्ता गमावावी लागली.

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख