उद्धव ठाकरे यांच्या काळात महाराष्ट्राची सर्वाधिक बदनामी - Maharashtra became most Defamation during Uddhav Thackeray's tenure : Ramdas Athavale | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उद्धव ठाकरे यांच्या काळात महाराष्ट्राची सर्वाधिक बदनामी

हुकूम मुलाणी
शनिवार, 10 एप्रिल 2021

समाधान आवताडे जरी ठेकेदार असले तरी चांगले कार्यकर्ते आहेत.

मंगळवेढा (जि. सोलापूर) : महाराष्ट्रातील परिस्थिती बिघडविण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या काळातच महाराष्ट्राची सर्वाधिक बदनामी झाली. शंभर कोटी रुपये हप्ता वसुली प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ज्याप्रमाणे राजीनामा दिला, त्याप्रमाणे मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवेढा येथे बोलताना व्यक्त केले.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री आज मंगळवेढा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी कृषी मंत्री अनिल बोंडे, भाजपचे उमेदवार समाधान अवताडे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शंकर वाघमारे, सुनील सर्वगौड, जितेंद्र बनसोडे, आंबादास कुलकर्णी, सचिन शिवशरण, दीपक चंदनशिवे, खंडू खंदारे, येताळा भगत, तालुकाध्यक्ष गौरीशंकर गुरुकुल, शहराध्यक्ष गोपाळ भगरे आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले की सध्या पोलिस अधिकारी आपल्या जीवाचे बाजी लावून कोरोनाशी लढताना अठरा-अठरा तास सेवा करीत आहेत. पण, ज्या गोष्टी दहशतवादी करतात, त्याच गोष्टी काही पोलिस अधिकाऱ्यांनी केल्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होऊ लागली आहे, त्यामुळे महाराष्ट्राचे तोंड काळे झाले. तुम्हाला सत्ता चालवता येत नसेल, तर सत्ता सोडा, असे आव्हानही त्यांनी ठाकरे यांना दिले.

सध्या एका बाजूला आपल्याला कोरोनाशी लढायचे आहे, तर दुसऱ्या बाजूला आपणाला राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा देखील सामना करायचा आहे. समाजामध्ये समता प्रस्थापित होण्यासाठी आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे. महिलांवरील अन्याय अत्याचार थांबले पाहिजेत, अशी मागणी आठवले यांनी केली. समाधान आवताडे जरी ठेकेदार असले तरी चांगले कार्यकर्ते आहेत, त्यामुळे या पोटनिवडणुकीत त्यांना संधी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

उमेदवार समाधान आवताडे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या विरोधातील असलेला आक्रोश दाखवण्यासाठी ही निवडणूक आहे. मंगळवेढा तालुक्याच्या विकासासाठी मला संधी द्यावी. या संधीचा मी उपयोग करून वंचित घटकांना, बेरोजगारांना काम देण्यासाठी प्रयत्न करीन व तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांना न्याय देईल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख