पंढरपूर : "भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पक्ष यांनी आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रासप हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्ष आहे. आम्ही संयुक्त पुरोगामी आघाडीत (यूपीए) गेलेलो नाही. पण, "एनडीए'त राहूनही आपण आपला पक्ष वाढविला पाहिजे. भाजप तसा प्रयत्न करते. भाजपच्या गाडीवर किती दिवस बसून जायचं, जरा आपणही वाढलं पाहिजे, यासाठी आम्ही राज्यभर फिरत आहोत,'' असे आमदार महादेव जानकर यांनी सांगितले.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी पंढरपूर येथे बोलताना त्यांनी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल माहिती दिली.
जानकर म्हणाले, वीजबिल माफीसाठी आम्ही सुरुवातीला निवेदने दिले होती. तसेच, दुधासाठी आंदोलन केले होते. आता भारतीय जनता पक्ष वीजबिल माफीसाठी आंदोलन करत आहे. भाजपला आमचा पाठिंबा आहे. पण, त्यांच्या आंदोलनात आम्ही सहभागी होण्याचा प्रश्नच येत नाही.
आंदोलनाच्या माध्यमातून प्रत्येक पक्षाची ताकद दिसून येते. तसा प्रयत्न भाजप, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पक्ष यांनी आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण किती दिवस त्यांच्या (भाजप) पाठीवर बसून जायचं. ते म्हणणार याचं काहीच नाही. त्यामुळे रासपची ताकद वाढावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष बाजूला पडला आहे. तो स्वंतत्र अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करत आहे, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत जानकर म्हणाले की, मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या स्थापनेपासून स्वतंत्र अस्तित्व दाखवत आहे. ते काही आज दाखवत नाही. मी जेव्हा मंत्री होतो, तेव्हासुद्धा मी (रासप) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वातंत्रपणे लढलो होतो. महायुतीमध्ये असूनही त्या वेळी मी भाजप, शिवसेनेच्या विरोधात लढलो होतो. फक्त विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांच्याबरोबर होतो.
परवा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होते, त्या वेळी मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होतो, त्यामुळे आमच्या काहीही प्रश्न नाही. आम्ही आमची संघटनात्मक ताकद अजमावत आहोत. मराठवाड्यात आमची ताकद आहे. पण, सोलापूर जिल्ह्यात आमची ताकद नाही, त्यामुळे पक्षाची बांधणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

