मंगळवेढ्यातील या कामासाठी सुशीलकुमार शिंदे, जयसिद्धेश्‍वर महाराजांचे गडकरींना पत्र  - Letter from Sushilkumar Shinde, Jayasiddheshwar Maharaj to Nitin Gadkari for flyover work in Mangalwedha taluka | Politics Marathi News - Sarkarnama

मंगळवेढ्यातील या कामासाठी सुशीलकुमार शिंदे, जयसिद्धेश्‍वर महाराजांचे गडकरींना पत्र 

हुकूम मुलाणी 
गुरुवार, 14 जानेवारी 2021

या मागणीची दखल कधी घेतली जाणार, याची चर्चा मंगळवेढ्यात होत आहे. 

मंगळवेढा : रत्नागिरी-नागपूर महामार्गावर मंगळवेढा तालुक्‍यात दोन ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात यावा, या मागणीसाठी आजी - माजी खासदारांनी लक्ष घातले. याबाबत त्यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे मागणीदेखील केली आहे, त्यामुळे या मागणीची दखल वाहतूक मंत्री घेणार का? असा सवाल तालुक्‍यातील नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. 

माचणूर येथील मुख्य चौकात उड्डाणपूल न करता मुख्य चौकापासून काही अंतरावर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने ते काम करण्याचा प्रयत्न केला असता ग्रामस्थांनी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्याकडे मुख्य चौकात उड्डाणपूल करावा. जेणेकरून रहाटेवाडी, तामदर्डी, बोराळे व माचणूर येथील बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी दक्षिण भागात असल्याने सोयीच्या दृष्टीने मुख्य चौकात उड्डाणपूल करावा, या मागणीचे निवेदन देण्यात आले. 

या वेळी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी दोन महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन संबंधित ठेकेदाराला त्या ठिकाणचे काम थांबण्याच्या सूचना दिल्या. त्याबाबतची मागणी पत्राद्वारे वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. त्यानंतर गेल्या चार दिवसांपूर्वी बोराळे, अरळी, सिद्धापूर, मुंढेवाडी या गावासह मंगळवेढ्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या जमीन पूर्व भागात असून उड्डाणपूल नसल्यामुळे त्यांना चार किलोमीटर अंतर जास्तीचे कापावे लागणार आहे. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल करावा, यासाठीच्या मागणीचे निवेदन माजी खासदार सुशीलकुमार शिंदे यांना देण्यात आले. 

शिंदे यांनीही या प्रश्नी लक्ष घातले असून त्यांनी बोराळेकडे जाणाऱ्या मार्गावर उड्डाणपूल करावा, या मागणीचे निवेदन वाहतूक मंत्री गडकरी यांना दिले. दोन वेगवेगळ्या ठिकाणी उड्डाणपूल करावे, या मागणीचे पत्र सोलापूरच्या आजी-माजी खासदारानी केंद्रीय वाहतूक मंत्री यांना दिले आहे. तालुक्‍यातील महामार्गाचे काम सध्या पूर्णत्वाकडे जात असल्याने या मागणीची दखल कधी घेतली जाणार, याची चर्चा मंगळवेढ्यात होत आहे. 

दरम्यान, या कामाचे सर्वेक्षण करताना संबंधित सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी उड्डाणपूल करण्याबाबतची गोष्ट का लक्षात आली नाही? असा प्रश्नही यानिमित्ताने विचारला जात आहे 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख