शरद पवार - शिवाजीराव भोसले यांची ती शेवटची भेटही होऊ शकली नाही  - The last meeting between Sharad Pawar and Shivajirao Bhosale could not take place | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवार - शिवाजीराव भोसले यांची ती शेवटची भेटही होऊ शकली नाही 

  संतोष शेंडकर 
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

पवारांना आमदारकी मिळण्याच्या आधीपासून भोसले हे त्यांचे 'अरे तुरे'मधील मित्र होते.​

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : पुणे जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव भोसले यांच्या पत्नीचे निधन तेरा दिवसांपूर्वीच झाले होते. ही बातमी समजताच ज्येष्ठ नेते शरद पवार हे भोसले यांना भेटायला वाणेवाडीला निघाले होते. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे भोसले यांना पुण्याला खासगी रुग्णालयात हलवावे लागले. उपचार सुरू असतानाच भोसले यांचे पत्नीच्या "तेराव्या'लाच निधन झाले आणि दोन मित्रांची शेवटची भेटही अधुरी राहिली. 

वाणेवाडी (ता. बारामती) येथील रहिवासी असलेल्या शिवाजीराव यशवंतराव भोसले यांच्या पत्नी विमल यांचे 18 ऑक्‍टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा आटोपून पवार बारामतीत आले होते. ता. 26 ऑक्‍टोबर रोजी शिवाजीराव भोसले यांना अकरा वाजता भेटायला घरी येतो आहे, असा त्यांचा निरोपही आला होता. 

पवारांना आमदारकी मिळण्याच्या आधीपासून भोसले हे त्यांचे "अरे तुरे'मधील मित्र होते. त्यामुळे शरद पवार भोसले यांच्या सुख दुःखात कायम सहभागी होत. शरद पवार मुख्यमंत्री असतानाही भोसले यांच्या मुलीच्या लग्नाला हजर राहिले होते. भोसले यांच्या आईच्या निधनानंतर घरी येऊन बराच वेळ गप्पा मारल्या होत्या. 

आताही पत्नीच्या मृत्यूनंतर पवारांनी भेटण्याची वेळ निश्‍चित केली होती. परंतु पत्नीच्या मृत्यूनंतर भोसले यांची प्रकृती आणखीनच खालावत गेली होती. त्यामुळे त्यांना कुटुंबीयांनी पुण्यातील खासगी रुग्णालयात नुकतेच हलविले होते. त्यामुळे त्यांची ही भेट पुढे ढकलली गेली होती. परंतु आज उपचार सुरू असतानाच भोसले यांचे सकाळी निधन झाले. यामुळे 1962 पासूनच्या दोन घनिष्ठ मित्रांची भेट अधुरी राहिली. 

निदान दिवाळीला तरी भोसले आणि पवार हे दोघे भेटतच. शक्‍यतो गोविंदबागेत भेट व्हायची, तर कधी भोसले यांच्या घरीही गप्पांची मैफल रंगलेली असायची. भोसलेंच्या निधनाने दिवाळी भेटही अधुरी राहणार आहे. दोघेही सुरवातीला "अरे तुरे'तील मित्र होते. पवार 1972 ला पहिल्यांदा मंत्री झाल्यानंतर ते "आमचे साहेब' झाले, असे भोसले सांगत. 

भोसले यांच्या पत्नीचा आज तेरावा विधी केला जाणार होता. त्याची तयारीही करण्यात आली होती. नेमक्‍या त्याच दिवशी भोसले यांचे निधन झाले. यामुळे पवार यांचा आणखी एक जुना मोहरा गळाला आहे. 

भोसले यांच्या निधनाने सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्राचेही नुकसान झाले आहे. कारखाना परिसरात त्यांचा दबदबा होता. कारखान्याचे राजकारण फिरविण्याची त्यांची ताकद होती. कारखान्याच्या निवडणुकांमध्ये, धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांचा शब्द महत्वाचा होता.

कारखान्याच्या वार्षिक सभांमध्ये सत्ताधारी-विरोधक वाद हे "सोमेश्वर'मध्ये ठरलेलेच असायचे. भोसले हे सभामंडपाच्या बाजूला खुर्चीवरून बसून राहत. जेव्हाजेव्हा वादात अटीतटीची वेळ येईल, तेव्हा भोसले माईक हातात घेत. त्यांनी वडिलकीचे चार शब्द मांडल्यावर दोन्ही गट त्यांचा शब्द प्रमाण मानून आपापल्या तलवारी म्यान करत. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख