भाजप खासदाराच्या बनावट जात प्रमाणपत्राचे 'उमरगा कनेक्‍शन' : गुन्हे अन्वेषण पथकाकडून चौकशी  - Inquiry into fake caste certificate case of MP Jayasiddheshwar Mahaswami in umarga | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप खासदाराच्या बनावट जात प्रमाणपत्राचे 'उमरगा कनेक्‍शन' : गुन्हे अन्वेषण पथकाकडून चौकशी 

अविनाश काळे 
शुक्रवार, 5 मार्च 2021

जात वैधता प्रमाणपत्र समितीकडे हा पुरावा सादर करण्यात आला होता. 

उमरगा : भारतीय जनता पक्षाचे सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या बनावट जातप्रमाणपत्र चौकशीच्या अनुषंगाने सोलापूरच्या गुन्हे अन्वेषण पथकाने डिग्गी (ता. उमरगा, जि. लातूर) येथील ग्रामपंचायत सदस्य गुरूबसय्या स्वामी यांची चौकशी केली. दरम्यान पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तहसीलदार संजय पवार यांची भेट घेऊन जात वैधता प्रमाणपत्रासाठी दाखल केलेल्या कागदपत्राची पाहणी केली. 

खासदार डॉ. महास्वामी यांच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्‍यक त्या पुराव्याची जमवाजमव 'उमरगा कनेक्‍शन' मधून झाल्याची माहिती समोर आली आहे. तालुक्‍यातील तलमोड येथील गुरूबसय्या स्वामी हा जुन्या काळातील व्यक्ती एका पाटलाचे शेत बटईने करत होता, त्या अनुषंगाने शेतजमिनीवर त्याचे नाव आले, अशी माहिती सांगितली जाते. जात वैधता प्रमाणपत्र समितीकडे हा पुरावा सादर करण्यात आला होता. 

दरम्यान महास्वामीचे जात प्रमाणपत्र अक्कलकोट तहसीलमधून निघाले, त्याचा पुरावा उमरगा कनेक्‍शनमधून जोडण्यात आला. हा सर्व प्रकार कोणत्या आधारे घेतला, बनावटगिरी कशी झाली, याचा सोक्षमोक्ष लावला जात आहे. या सर्व प्रकारामुळे खासदार डॉ. महास्वामी चांगलेच अडचणीत आले आहेत. 

खासदार महास्वामींना ओळखत नाही : गुरूबसय्या स्वामी 

सोलापूरच्या गुन्हे अन्वेषष शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंके यांचे पथक चौकशीसाठी उमरग्यात आले होते. डिग्गी ग्रामपंचायतीचे सदस्य, सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी गुरुबसय्या स्वामी यांची पथकाने चौकशी केल्याची माहिती सांगण्यात येत आहे. यात नेमकी कोणती चौकशी झाली, या बाबतची अधिकृत माहिती समोर आली नाही. 

दरम्यान, चौकशी झालेला व्यक्ती स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या पोलिसांनी चौकशी केली. खासदार डॉ. महास्वामींना मी ओळखत नाही. मात्र, मागच्या वर्षी समाजबांधव म्हणून माझ्याकडे काही व्यक्ती आल्या होत्या. त्यांच्याकडे तहसील कार्यालयातील नकला होत्या. नकलेचा संदर्भ तोलामोलाचा असल्याने शपथपत्रासाठी तेथील चार लोकांशी संपर्क केला. यात माझी एवढीच भूमिका होती. समितीने पुन्हा चौकशीसाठी सोलापूरला बोलावले आहे. 

मूळ कागदपत्रं हायकोर्टात 

सोलापूरच्या एलसीबीचे अधिकारी आले होते, त्यांनी खासदार डॉ. महास्वामी यांच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी पुरावा म्हणून सादर केलेल्या मूळ कागदपत्राची मागणी केली. मात्र, मूळ कागदपत्र मुंबई उच्च न्यायालयात दाखल असल्याने त्यांना छायांकित प्रति देण्यात आल्या, असे तहसीलदार संजय पवार यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख