पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा (स्व.) आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगिरथ भालके यांनाच द्यावी, अन्यथा कार्यकर्ते वेगळा विचार करतील, अशी भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे निरीक्षक सुरेश घुले यांच्यासमोर व्यक्त केल्या. कार्यकर्त्यांच्या भावना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत पोचवल्या जातील, असे आश्वासन पक्षाचे निरीक्षक सुरेश घुले यांनी दिले.
आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी निरीक्षक सुरेश घुले आज (ता. 27 फेब्रुवारी) पंढरपुरात आले होते. भालके यांच्या निवासस्थानी आज दुपारी याबाबतची बैठक झाली. तीमध्ये पक्षाच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोटनिवडणुकीची उमेदवारी भगिरथ भालके यांनाच द्यावी, अशी एकमुखी मागणी केली.
विधानसभा पोटनिवडणुकीच्या हालचालींना सध्या वेग आला आहे. लवकरच निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदार संघाचे निरीक्षक घुले कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी आले होते.
यावेळी विठ्ठल कारखान्याचे संचालक विजयसिंह देशमुख, शालीवाहन कोळेकर, माजी सरपंच मारुती मासाळ, माजी नगरसेवक नागेश यादव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष निरीक्षकांसमोर आमदार भारत भालके यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचे पुत्र भगिरथ भालके यांनाच उमेदवारी द्यावी; अन्यथा कार्यकर्ते वेगळा विचार करतील, अशा भावनाही बोलून दाखविल्या.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे, प्रवक्ते उमेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष गणेश पाटील, तालुका अध्यक्ष दीपक पवार, शहराध्यक्ष सुधीर भोसले, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा संगीता माने, तालुका अध्यक्षा अनिता पवार, विठ्ठल कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार, संचालक मोहन कोळेकर, विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संदीप मांडवे आदी उपस्थित होते.
हेही वाचा : भालके-परिचारक स्नेह वाढला; ते स्मृतिपत्र देण्यासाठी प्रशांत परिचारक भालकेंच्या घरी!
पंढरपूर ः आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. येत्या काही दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रमदेखील जाहीर होईल, असा अंदाज असतानाच गेल्या 20 वर्षांपासून राजकीय विरोधक असलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक आणि भालके कुटुंबीयांतील राजकीय व कौटुंबीक स्नेह वाढू लागला आहे.
आमदार भालके यांच्या निधनानंतर परिचारक-भालके यांच्यातील राजकीय दरी खूप कमी झाल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. विधानसभेने (कै.) आमदार भारत भालके यांच्या स्मरणार्थ दिलेले स्मृतिपत्र आज (ता. 27 फेब्रुवारी) आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते भगिरथ भालके व त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्त करण्यात आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर वाढलेला परिचारक-भालके कुटुंबीयांचा स्नेह पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.

