मनावर घेतले की शरद पवार कार्यक्रमच करतात 

शरदराव आणि माझ्यात कसलेही अंतर नाही.
Former Union Home Minister Sushilkumar Shinde shared his memories of Sharad Pawar
Former Union Home Minister Sushilkumar Shinde shared his memories of Sharad Pawar

सोलापूर : शरदरावांनी एखादी गोष्ट मनावर घेतली की ते कार्यक्रमच करतात, अशी मिश्‍किली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. उपस्थितांमधील तो हशा पाहून शिंदे यांनाही हसू आवरता आले नाही. तुमच्या मनात जो कार्यक्रम आहे, तोच कार्यक्रम माझ्याही मनात असल्याचे सांगून त्यांनी "कार्यक्रम' या शब्दाबाबत आणखी गूढ वाढवले. 

सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथील दत्तात्रेय काळे यांनी विकसित केलेल्या किंगबेरी या नवीन द्राक्ष वाणाचा लोकार्पण सोहळा शनिवारी (ता. 13 फेब्रुवारी) माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी शिंदे बोलत होते. 

शरदराव आणि माझ्यात कसलेही अंतर नाही. शरदरावांनी मला आताच द्राक्ष भरविल्याचे तुम्हीही पाहिले आहे. त्यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल असा दाखलाही शिंदे यांनी त्यांच्या भाषणात दिला. 

माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला एवढे मोठे करण्याचा हा अद्‌भूत चमत्कार शरदरावांमुळे शक्‍य झाला. शरदरावांचे माझ्यावर राजकीय प्रेम असो वा नसो आमच्यात अद्यापही मैत्री आहे. आमच्यात ताटातूट करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. ताटातूट करण्याचा प्रयत्न करणारे आमच्यासोबत मांडीला मांडी लावून बसणारे व जवळचेच आहेत. शरदरावांनी अशा व्यक्तींना कधीही थारा दिला नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा वारसा घेऊन शरदराव काम करत असल्याने त्यांनी अशा गोष्टींना थारा दिला नसल्याचेही शिंदे यांनी या वेळी आवर्जून सांगितले. 

माझी शेती बघण्यासाठी पवार बलराम जाखडांना घेऊन आले होते 

आम्ही 1978 मध्ये सर्वजण कॉंग्रेस पक्षात एकत्र होतो. त्यावेळी कॉंग्रेसमध्ये फाटाफूट झालेली नव्हती. सोलापुरातील कारंबा गावाजवळ शरद पवारांनी माझ्यासाठी पाच एकर शेती बघितली. शेतीकडे लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी मला केली. त्यावेळी मी नकार दिला होता. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या सरकारमध्ये मला मंत्रिपदासाठी डावलण्यात आले. मंत्रिपदाची संधी हुकल्याने मी शेतीकडे लक्ष द्यायचा निर्णय घेतला आणि बारा एकरापासून शेतीला सुरुवात केली. आता ती 34 एकरांपर्यंत वाढत गेली आहे. माझ्या शेतीमालाला शरदरावांमुळे इतरांपेक्षा अधिक दर मिळत गेला. माझी शेती बघण्यासाठी पवार बलराम जाखड यांना घेऊन आले होते, अशी आठवण सुशीलकुमार शिंदे यांनी या वेळी कथन केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com