आढळरावांच्या समर्थकाने धरली राष्ट्रवादीची वाट  - Former MP Shivajirao Adhalrao Patil's supporter joins NCP | Politics Marathi News - Sarkarnama

आढळरावांच्या समर्थकाने धरली राष्ट्रवादीची वाट 

भरत पचंगे 
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

शिरुर बाजार समितीचे माजी सभापती तथा घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश पवार यांनी हा पक्षप्रवेश घडवून आणला आहे. 

शिक्रापूर (जि. पुणे)  : राज्यातील महाविकास आघाडीत शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र नांदत असताना शिरूर लोकसभा मतदारसंघात मात्र या दोन्ही पक्षात कायम कुरबुरी सुरू असतात. आताही महाआघाडीत बिघाडी दिसून येत असून शिरूर तालुक्‍यातील जातेगाव बुद्रुक येथील शिवसेना आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले सुनील गजानन होळकर व त्यांच्या पत्नी अलका होळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शिरुर बाजार समितीचे माजी सभापती तथा घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश पवार यांनी हा पक्षप्रवेश घडवून आणला आहे. 

मागील पंचवार्षिकमध्ये जातेगाव बुद्रुक ग्रामपंचायत ही शिवसेना विचारांच्या पदाधिकाऱ्यांच्या हातात होती. जातेगाव बुद्रूक म्हणजे जिल्हा दूध संघाच्या जेष्ठ संचालिका केशरताई पवार, जेष्ठ उद्योजक सदाशिवराव पवार तसेच प्रकाश पवार यांचे गाव. या वेळी संपूर्ण ताकद लावून पवार परिवाराने ग्रामपंचायत जिंकली. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत असलेले सुनील होळकर तसेच त्यांच्या पत्नी विद्यमान ग्रामपंचायत सदस्या अलका होळकर यांना राष्ट्रवादीत आणले. 

दरम्यान, जातेगावात या वेळी इतर मागासवर्गीयासाठी सरपंचपदाचे आरक्षण निघाले. सरपंचपदाबद्दल तालुक्‍यात उत्सुकता आहे. याच पार्श्वभूमीवर कट्टर शिवसैनिक असलेल्या होळकर कुटुंबाने राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी होळकर उभयंतांचे पक्षात स्वागत केले. 

जातेगावच्या सर्वांगिण विकासासाठी सर्व विचारांचे सदस्य राष्ट्रवादीत असणे गरजेचे असून त्या दृष्टीने आपण पुढाकार घेवून हा पक्षप्रवेश घडवून आणल्याची माहिती माजी सभापती प्रकाश पवार यांनी दिली. 

या वेळी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, जिल्हा दूध संघाच्या संचालिका केशरताई पवार, पुणे जिल्हा विकास मंचचे संस्थापक तथा उद्योजक सदाशिवराव पवार, माजी सरपंच हनुमंत क्षीरसागर, निवृत्त सुभेदार सुरेश उमाप, ज्येष्ठ पदाधिकारी रमेश फणसे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य किशोर खळदकर, गणेश उमाप, राहुल पवार, सुमन क्षीरसागर उपस्थित होते. 

हेही वाचा : भालके गटाने पोटनिवडणुकीचे रणशिंग फुंकले; भगिरथ भालके काढणार जनसंवाद यात्रा 

मंगळवेढा : (स्व.) आमदार भारत भालके यांच्या जयंतीचे (ता. 13 फेब्रुवारी) औचित्य साधून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील प्रत्येक गावांत जाऊन नागरिकांशी संवाद साधण्यासाठी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष तथा भालके यांचे चिरंजीव भगिरथ भालके यांनी जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे. राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत उद्यापासून (ता. 13 फेब्रुवारी) ही यात्रा सुरू होणार आहे. 

भालके यांच्या निधनानंतर मतदारसंघातील अनेक गोरगरिब माता-भगिनी, नागरिक, तसेच शेतकरी बांधवांनी भेटून आधार दिला. त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी ही जनसंवाद यात्रा काढण्यात येत असल्याचे भालके गटाकडून सांगण्यात येत आहे. असे असले तरी थेट जनतेशी संपर्क साधण्याच्या या दौऱ्यामुळे भालके गटाने पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे मानले जात आहे. 

तीन वेगवेगळ्या पक्षातून आमदार झालेले भारत भालके हे नेहमी पक्षांपेक्षा व्यक्तिगत राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेले आहेत. जनता हाच माझा पक्ष ही भूमिका ठेवून अकरा वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी जबाबदार अधिकाऱ्याला मोबाईलवरून फोन करत तो प्रश्न सोडवून घेत असत. स्पष्टवक्तेपणा आणि सडेतोड बोलणे, यामुळे अधिकारीवर्गातही आमदार भालके यांच्याविषयी आदरयुक्त भीती निर्माण झाली होती. त्यांच्या अकाली निधनामुळे मतदार संघाचे रखडलेले प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही सांत्वनपर भेटीच्यादरम्यान आमदार भालके यांनी हाती घेतलेली अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख