'विठ्ठल'च्या मार्गातील विघ्न हटेना; अध्यक्ष भालकेंसह 32 जणांना कोरोना  - Disruption in the way of Vitthal Sugar Factory; 32 people, including President Bhalke, were infected with the corona | Politics Marathi News - Sarkarnama

'विठ्ठल'च्या मार्गातील विघ्न हटेना; अध्यक्ष भालकेंसह 32 जणांना कोरोना 

भारत नागणे 
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

भारत भालके यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत भालके यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांना कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. 

दरम्यान, अडचणीत असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वाटेतील विघ्ने हटायला तयार नाहीत, असेच दिसते. कारण, गेल्या वर्षी बंद असलेल्या हा कारखाना राज्य सरकारने थकहमी दिल्याने यंदा सुरू करण्यात आला. मात्र, गाळप हंगामाच्या तोंडावरच कारखान्याचे अध्यक्ष भालके, संचालक भगिरथ भालके आणि कार्यकारी संचालकांसह 30 ते 32 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

मागील आठवड्यापूर्वी विठ्ठल कारखान्याचे संचालक व आमदार भालके यांचे पुत्र भगीरथ भालके, कार्यकारी संचालक व वर्क्‍स मॅनेजर हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर आज आमदार भालके यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 

भालके अध्यक्ष असलेल्या विठ्ठल कारखाना आर्थिक अडचणींवर मात करून गाळप हंगामासाठी सज्ज असतानाच कारखान्यातील 28 ते 30 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये कारखान्याचे दोन शेती अधिकारी, दोन इंजिनिअर, एक व्होअरशियर, 25 चिटबॉय आदींचा समावेश आहे. 

ऐन गाळप हंगामाच्या तोंडावर कारखान्याचे अध्यक्ष, संचालक, कार्यकारी संचालकांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाल्याने कारखाना परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कारखान्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पंढरपूर, अकलूज व वाखरी येथील रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. 

दरम्यान, दसऱ्याच्या (ता. 25 ऑक्‍टोबर) दिवशी आमदार भारत भालकेंच्या उपस्थितीत कारखानाच्या गाळप हंगामाचा प्रारंभ करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख