विरोधकांना चकवण्यासाठी सदस्य नसलेल्या गाडीस संरक्षण अन्‌ सदस्याची गाडी पाठीमागून नेली ग्रामपंचायतीत  - Discussion on election of Sarpanch of Kadlas Gram Panchayat in Solapur district | Politics Marathi News - Sarkarnama

विरोधकांना चकवण्यासाठी सदस्य नसलेल्या गाडीस संरक्षण अन्‌ सदस्याची गाडी पाठीमागून नेली ग्रामपंचायतीत 

प्रमोद बोडके 
मंगळवार, 2 मार्च 2021

सुनीता भजनावळे यांचा अर्ज काढण्यासाठी परिवर्तन पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी स्टॅम्प पेपरवर तयार केलेली नोटरी सरपंच निवडीच्या दिवशी आयत्या वेळी पळविण्यात आली.

सोलापूर : ग्रामपंचायतीच्या राजकारणावर अनेक चित्रपट येऊन गेले. अलिकडेच आलेल्या धुराळा या मराठी चित्रपटाने गावचे राजकारण ठळकपणे मांडले. सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्‍यातील कडलास गावात सरपंच निवडीत घडलेले किस्से आणि राजकारण सध्या तालुक्‍यात चर्चेचा विषय ठरले आहेत. अनुसुचित जातीसाठी आरक्षित असलेल्या सरपंचपदाच्या निवडीतील कडलासचा हा "धुराळा' राजकारणातील डावपेचा अन्‌ इर्षेचा ठरला आहे. 

ज्येष्ठ नेते बाबूराव गायकवाड, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमाला गायकवाड आणि जिल्हा दूध संघाचे संचालक मारुती लवटे या दिग्गज नेत्यांचे गाव म्हणून कडलासची ओळख आहे. ग्रामपंचायतीच्या 17 जागांपैकी गायकवाड-लवटे यांच्या ग्रामविकास आघाडीला 9 जागा मिळाल्या होत्या. त्यांच्या विरोधात लढलेल्या सुनील पवार, डॉ. सयाजीराव गायकवाड, दत्ता टापरे, डॉ. विजय बाबर, संजय लेंडवे यांच्या परिवर्तन आघाडीला आठ जागा मिळाल्या. 

कडलासचे सरपंच अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले. निवडून आलेल्या सदस्यांमधील अनुसुचित जातीचे सुनीता भजनावळे व दिगंबर भजनावळे हे दोन्ही उमेदवार परिवर्तन आघाडीकडेच होते. 

न्यायालयात दाखल झालेल्या तक्रारीनंतर सांगोला तालुक्‍यात नव्याने आरक्षण सोडत नाही. कडलासचे सरपंचपद पुन्हा एकदा अनुसूचित जातीसाठीच आरक्षित झाले. तेव्हा सरपंचपदाच्या निवडीची खरी चुरस सुरु झाली. अनुसूचित जातीच्या दोन्ही उमेदवारांना सहकुटुंब तब्बल दीड महिना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. सरपंचपदासाठी परिवर्तनच्या सुनीता भजनावळे यांचा अर्ज प्रतिनिधीमार्फत करण्यात ग्रामविकास आघाडीला यश मिळाले. 

पण, ऐनवेळी दिगंबर भजनावळे यांना सरपंच करण्याचे ठरले. सुनीता भजनावळे यांचा अर्ज काढण्यासाठी परिवर्तन पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी स्टॅम्प पेपरवर तयार केलेली नोटरी सरपंच निवडीच्या दिवशी आयत्या वेळी पळविण्यात आली. त्यामुळे सुनीता यांचा अर्ज माघार घेण्याबाबत पेच निर्माण झाला, मात्र, परिवर्तन आघाडीच्या प्रमुखांनी सुनीता भजनावळे यांचा अर्ज माघारी घेऊन दिगंबर भजनावळे यांना सरपंच करण्याचे अवघड काम यशस्वीपणे पार पाडले. 

गाड्यांची शक्कल अन्‌ चकवा 

सांगोल्यातून कडलास ग्रामपंचायतीकडे येताना तीन गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तीनही गाड्या वेगळ्या दिशेने आणण्यात आल्या होत्या. ज्या गाडीत सदस्य नव्हता, सुनील पवार यांची कन्या होती, त्या गाडीला संरक्षण देण्यासाठी पोलिसांना हाका मारण्यात आल्या. पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामुळे सरपंच निवडी दिवशी ग्रामपंचायतीला छावणीचे स्वरुप आले होते.

ज्या गाडीत सदस्या सुनीता भजनावळे होत्या, ती गाडी मागच्या दिशेने ग्रामपंचायत जवळ नेऊन त्यांना अक्षरश: पळवतच ग्रामपंचायतीत नेण्यात आले. माझा अर्ज माघारी घ्यायचा आहे, अशी विनंती सुनीता यांनी केली. अधिकाऱ्यांनी पाचवेळा विचारले कोणाचा दबाव आहे का? त्यावेळी त्यांनी नाही म्हणून सांगितले. त्यांचा अर्ज माघारी घेतला आणि सरपंचपदी दिगंबर भजनावळे यांची बिनविरोध निवड झाली.

विरोधकांना चकवा देण्यासाठी गाड्यांची शक्कल सध्या कडलास परिसरात चर्चेचा विषय आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख