पोटनिवडणुकीत कोरोना होऊन शिक्षकासह चौघांना गमावलेल्या माने कुटुंबीयांस फडणवीसांचा फोन

निवडणुकीच्या यशापयशाची चर्चा होत असताना एक हसते-खेळते कुटुंब उद्‌ध्वस्त झाले.
Devendra Fadnavis consoled the family of teacher Pramod Mane
Devendra Fadnavis consoled the family of teacher Pramod Mane

सांगोला  (जि. सोलापूर) : पंढरपूर पोटनिवडणुकीत (Pandharpur by-election) कर्तव्य बजावत असताना कोरोनाचा (Corona) संसर्ग झालेल्या सांगोला तालुक्‍यातील घेरडी येथील प्रमोद माने (Pramod Mane) या शिक्षकासह  कुटुंबातील चौघांचा कोरोनाने मृत्यू झाला. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी फोन करून माने कुटुंबीयांना धीर दिला. प्रमोद माने यांचे बंधू डॉ. प्रवीण यांच्याशी फोनवरून संवाद साधत या दुःखात आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशा शब्दांत फडणवीस यांनी माने कुटुंबीयांना आधार दिला. (Devendra Fadnavis consoled the family of teacher Pramod Mane)

पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये मतदान कर्मचारी म्हणून कर्तव्यावर असताना प्रमोद माने या प्राथमिक शिक्षकाला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. निवडणुकीच्या यशापयशाची चर्चा होत असताना एक हसते-खेळते कुटुंब उद्‌ध्वस्त झाले. जगधनेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक प्रमोद वसंतराव माने (वय 50) यांची पोटनिवडणुकीसाठी मतदान कर्मचारी म्हणून नेमणूक झाली होती. त्यांना 16 एप्रिल रोजी पंढरपूर येथे बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांनी 17 एप्रिल रोजी आसबेवाडी (ता. मंगळवेढा) येथे निवडणूक कर्मचारी म्हणून सकाळी सात ते सायंकाळी सात असे सलग बारा तास कर्तव्य पार पाडले. ता. 17 एप्रिल रोजी रात्री उशिरा निवडणुकीचे सर्व साहित्य पंढरपूर येथे जमा करून ते घरी परतले. मात्र, घरी परतत असताना सोबत कोरोनाही आला. 

घरी परतल्यानंतर 19 एप्रिलपासून त्यांना त्रास सुरू झाला. सुरूवातीला निवडणूक कामातील ताणतणावामुळे त्रास होत असेल असे वाटले. त्रास वाढू लागल्याने कोरोनावरील उपचारही लगेच सुरू केले. त्रास काही केल्या कमी होईना म्हणून त्यांना 25 एप्रिल रोजी सांगोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच वेळी त्यांचे वडील वसंतराव माने, आई शशिकला माने व मावशी जयश्री कोडग यांनाही कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावरही सांगोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले.

प्रमोद माने यांचे भाऊ प्रवीण व त्यांची पत्नी दोघेही डॉक्‍टर असून ते मुंबईत कार्यरत आहेत. त्यांचे बंधू डॉ. प्रवीण माने यांनी त्यांना उपचारासाठी 28 एप्रिल रोजी मुंबई येथे नेले. दुसऱ्याच दिवशी आई व वडील यांनाही उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आले. मावशी जयश्री कोडग यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे असे वाटत असतानाच त्यांचाही त्रास वाढल्याने त्यांना 3 मे रोजी मुंबई येथे हलवण्यात आले. या सर्वांवर मुंबईत उपचार सुरू असताना प्राथमिक शिक्षक असणारे प्रमोद माने यांचा 4 मे रोजी मृत्यू झाला. 5 मे रोजी मावशी जयश्री कोडग (वय 68) यांचे निधन झाले. एकामागून एक दुःख पचवत असताना माने कुटुंबीयांवर दुःखाचे आघात होत होते. वडील वसंतराव माने (वय 75) यांचे 6 मे रोजी, तर प्रमोद यांची आई शशिकला माने (वय 70) यांचे 7 मे रोजी निधन झाले.

बघता-बघता माने कुटुंबातील चार सदस्य सलग चार दिवस काळाच्या पडद्याआड  गेले. प्रमोद माने यांची पत्नी गौरी व मुलगा ऋग्वेद (वय 12) यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, ते यातून बाहेर पडले आहेत. ते सध्या मुंबईत आहेत. 

कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कळविली. त्यावेळी फडणवीस यांनी तत्काळ मुंबई येथील डॉक्टर प्रवीण माने यांच्याशी फोन करुन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. आम्ही आपल्या दुःखात सामील असून काही अडचण आल्यास फोन करा, अशा शब्दांत धीर दिला. 

डॉक्टर असूनही आई-वडिलांवर उपचार करू शकलो नाही

कोरोनाच्या काळात भाऊ, आई-वडील व मावशीचा मृत्यू झाला. या काळात कोरोनाची लागण झालेल्या भावास सांगोला येथून मुंबई येथे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले; परंतु प्रकृती बिघडल्याने त्यांचा तेथे मृत्यू झाला. डॉक्टर असूनही आई-वडिलांवर या महामारीच्या काळात उपचार करता आले नाहीत आणि महामारीतून त्यांना वाचवता येईल येऊ शकले नाही, याची फार मोठी खंत आयुष्यभर राहणार असल्याचे डॉ. प्रवीण माने यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com