अजितदादांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या पोटनिवडणुकीची रणनीती संजयमामांच्या फार्महाऊसवर ठरणार - Deputy Chief Minister Ajit Pawar is on a two-day visit to Pandharpur from Thursday | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या पोटनिवडणुकीची रणनीती संजयमामांच्या फार्महाऊसवर ठरणार

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 7 एप्रिल 2021

त्यामुळे भाजपसमोरील आव्हान आणखी वाढणार आहे.

श्रीपूर (जि. सोलापूर) : पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारपासून (ता. ८ एप्रिल) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. गुरुवारी सकाळी त्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे नेते कल्याण काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या फार्महाऊसवर त्यांचा मुक्काम आहे. दोन दिवसांच्या या दौऱ्यात पवार हे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात सभांद्वारे मतदारांशी संवाद साधणार आहेत.

पंढरपूर मंगळवेढ्याच्या पोटनिवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत बदल घडवायचा या इराद्याने भाजपने आपली ताकद पणाला लावली आहे. तर, विक्रमी मताधिक्क्यासह विजय मिळविण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते कामाला लागले आहेत. आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली आहे. त्यामुळे आपला गड अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी येथे विशेष लक्ष घातले आहे. या निवडणुकीसाठी भगिरथ भालके यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला, त्यादिवशी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंढरपुरात येऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. प्रचार शुभारंभासाठी देखील जयंत पाटील उपस्थित होते. त्यानंतर आता दोन दिवसांसाठी उपमुख्यमंत्री पवार या मतदारसंघात तळ ठोकणार आहेत.

भाजप नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

या निवडणुकीतून सिध्देश्वर आवताडे यांनी माघार घ्यावी, यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दोन दिवस केलेले प्रयत्न निष्फळ ठरले आणि सिध्देश्वर आवताडे यांची उमेदवारी कायम राहिली. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे, तर महाविकास आघाडीचा उत्साह वाढला आहे. त्यातच भाजपचे नेते कल्याण काळे यांना राष्ट्रवादी कॉग्रेसच्या गोटात आणण्यात आमदार संजयमामा शिंदे यशस्वी झाले आहेत.

भाजपसमोरील आव्हान आणखी वाढणार 

काळे यांनी भाजपमध्येच थांबावे, यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर, भाजपचे पक्षनिरीक्षक बाळा भेगडे यांनी भेटून विनंती केली. मात्र, त्याला काळे यांनी दाद दिली नाही. आमदार शिंदे यांनी काळे यांची उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी भेट घडवून आणल्यानंतर, उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत काळेंचा राष्ट्रवादीत प्रवेश होत आहे. काळे यांचा हा प्रवेश महाविकास आघाडीला बळ देणारा ठरणार आहे. सिध्देश्वर आवताडे यांचे मन वळविण्यात आणि कल्याण काळे यांना पक्षात थांबविण्यात भाजपच्या नेत्यांना यश आले नाही. त्यामुळे भाजपसमोरील आव्हान आणखी वाढणार आहे. आमदार शिंदे यांच्या सक्रियतेमुळे महाविकास आघाडीच्या गोटात आत्मविश्वास वाढला आहे.

शिंदेंच्या फार्महाऊसवर अजित पवार मुक्कामी

उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी आमदार शिंदे यांच्या फार्महाऊसवर मुक्कामी आहेत. या वेळी पंढरपूर मंगळवेढ्याच्या निवडणुकीसह जिल्ह्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीवर खलबते होऊन राजकारणाची पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे.

पंढरपूरमध्ये तीन, तर मंगळवेढ्यात पाच सभा होणार

अजित पवार हे दोन दिवस मतदारसंघात थांबणार आहेत. गुरुवारी सकाळी ९ वाजता काळे यांचा पक्षप्रवेश होणार आहे. दुपारी दोन वाजता गादेगाव, चार वाजता खर्डी, सहा वाजता कासेगाव या पंढरपूर तालुक्यातील गावांत त्यांच्या सभा होणार आहेत. मंगळवेढा तालुक्यातील मुडवी, बोराळे, हुलजंती, नंदेश्वर, लक्ष्मी दहिवडी येथे शुक्रवारी त्यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी मंगळवेढ्यासाठीदेखील त्यांनी वेळ राखून ठेवला आहे. यावेळी त्यांच्यासोबत महाविकास आघाडीतील घटकक्षाच्या अनेक नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख