पंढरपुरात राष्ट्रवादीला 2019 च्या पुनरावृत्तीची भीती; एबी फॉर्म कोणाला मिळणार  - Curiosity as to which candidates will get AB Farm from Pandharpur constituency | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

पंढरपुरात राष्ट्रवादीला 2019 च्या पुनरावृत्तीची भीती; एबी फॉर्म कोणाला मिळणार 

हुकूम मुलाणी 
शनिवार, 27 मार्च 2021

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आघाडी असतानाही 2019 च्या निवडणुकीत एबी फार्म देण्यात गोंधळ झाला होता.

मंगळवेढा (जि. सोलापूर) : पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी संभाव्य पक्षीय उमेदवारांनी उमेदवारी अर्ज नेले असले तरी त्यांनी ते अद्याप निवडणूक कार्यालयात दाखल केले नाहीत. पक्षाची अधिकृत उमेदवारी आणि एबी फॉर्म कोणाला मिळणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून राहिली आहे. कारण, एबी फॉर्मचा पंढरपूर इतिहास रंजक आहे. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने एबी फॉर्म दिलेल्या उमेदवाराने ऐनवेळी माघार घेण्यास नकार दिला होता. यंदाही महाविकास आघाडीतील दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अर्ज नेले असून राष्ट्रवादीला 2019 मध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे. 

भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी 23 मार्चपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये अपक्षांचाच भरणा आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 30 मार्च आहे. पक्षीय उमेदवारांचे अर्ज अद्यापही दाखल झालेले नाहीत. 

हेही वाचा  : राष्ट्रवादीत गेलेल्या 18 नगरसेवकांबाबत कॉंग्रेस घेणार हा निर्णय 

भारतीय जनता पक्ष देईल त्या उमेदवाराचा प्रचार करण्याची भूमिका आमदार प्रशांत परिचारक यांनी घेतली असल्यामुळे भाजपकडून संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्यात जमा आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी पक्षाकडून कधी जाहीर होते की धक्कादायक रितीने अन्य कुणाचे नावे पुढे येते, हे पाहणे औत्सुक्‍याचे आहे. 

समाधान आवताडे यांच्या नावाने त्यांचे कार्यकर्ते बालम मुलाणी यांनी अर्ज नेला आहे. तो अद्याप निवडणूक कार्यालयात सादर करण्यात आलेला नाही. समाधान आवताडे यांचे चुलत बंधू मंगळवेढा खरेदी विक्री सहकारी संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांनी देखील अर्ज घेतला आहे, त्यामुळे आवताडे बंधूंमध्ये बेबनाव आहे की काय? अशी चर्चा मतदारसंघात होत आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून संभाव्य इच्छुक असलेले भगिरथ भालके यांनी स्वतःच, तर दिलीप कोरके यांनी जयश्री भालके यांच्या नावावर अर्ज नेले आहेत. परंतु अद्याप त्यांच्याकडूनही अर्ज दाखल झालेले नाहीत. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सोलापूर जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी मात्र अपक्ष अर्ज दाखल केला आहे. 

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आघाडी असतानाही 2019 च्या निवडणुकीत एबी फार्म देण्यात गोंधळ झाला होता. आमदार भारत भालके यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने अधिकृत उमेदवारी दिली होती. तसेच, आघाडीतील कॉंग्रेस पक्षानेही शिवाजी काळुंगे यांना एबी फार्म दिला होता. त्यावरून कॉंग्रेस-राष्ट्रवादीत ऐन निवडणुकीत गोंधळ निर्माण झाला होता. काळुंगे यांनीही ऐनवेळी अर्ज मागे घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे कॉंग्रेसला त्यांची हकालपट्टी करावी लागली होती. 

यंदाही महाविकास आघाडीतील शैला गोडसे यांनी अर्ज भरला आहे. मात्र, त्यांना अद्याप कुठल्याही पक्षाचा एबी फॉर्म मिळालेला नाही. भाजप विरोधात शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे महाविकास आघाडीत असल्यामुळे कोणत्या उमेदवारास एबी फॉर्म मिळणार, याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे. याशिवाय याच महाविकास आघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एबी फार्मबद्दलही उत्सुकता राहणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख