चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप; राष्ट्रवादी बोगस मतदान करण्याची शक्‍यता  - Chandrakant Patil's serious allegations against NCP; Possibility of NCP bogus voting | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप; राष्ट्रवादी बोगस मतदान करण्याची शक्‍यता 

हुकूम मुलाणी
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

प्रत्येक केंद्रावर थोडे थोडे मतदान बोगस झाले, तर त्याचा परिणाम उमेदवाराच्या मताधिक्‍यावर होऊ शकतो.

मंगळवेढा : पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक दोन्ही पक्षानी प्रतिष्ठेची केली आहे. सत्तेच्या बळावर राष्ट्रवादीकडून बोगस मतदान होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही; म्हणून कार्यकर्त्यांनी डोळ्यात तेल घालून पदवीधर निवडणुकीचे मतदारांकडून मतदान करून घ्यावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. 

पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने ते सोलापूर दौऱ्यावर आले असता मंगळवेढा येथील आमदार प्रशांत परिचारक यांच्या संपर्क कार्यालयात उपस्थित कार्यकर्त्यांची संवाद साधत असताना त्यांनी वरील आरोप केला. 

पाटील म्हणाले की सध्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची प्रचार यंत्रणा व कार्यकर्त्यांचे जाळे अतिशय सक्षमपणे राबवली जात आहे. पण, सत्तेच्या बळावर शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मतदानादिवशी अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. प्रत्येक केंद्रावर थोडे थोडे मतदान बोगस झाले, तर त्याचा परिणाम उमेदवाराच्या मताधिक्‍यावर होऊ शकतो. हा धोका लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी डोळ्यात तेल घालून आत जाणाऱ्या प्रत्येक मतदारावर लक्ष ठेवावे. 

"एका मतदान केंद्रावर तीन ते चार एजंट नेमून योग्य तेच मतदान करून घ्यावे. चुकीचे मतदान झाल्यास मतदान बाद होऊन त्याचा परिणाम निकालावर होऊ शकतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी भाजपच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान करून घ्यावे,' असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले. 

या वेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, तालुकाध्यक्ष संतोष मोगले, शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, राजेंद्र सुरवसे, शिवानंद पाटील, अशोक माळी, सुरेश जोशी, पप्पू स्वामी, औदुंबर वादेकर, सुदर्शन यादव, सुशांत हजारे, राहुल अवताडे, विजय बुरकुल, दशरथ काळे, नामदेव जानकर, पदवीधर मतदार संघ संयोजक स्वप्निल नलवडे, बबलू सुतार, प्रणव परिचारक, सचिन चौगुले आदी उपस्थित होते. 

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या दौऱ्यात शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष ऍड सुजित कदम व रतनचंद शहा बॅंकेचे अध्यक्ष राहुल शहा यांच्या निवासस्थानी भेट देऊन पदवीधर व शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांना उत्साह निर्माण केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख