बागल गटाच्या अडचणीत भर; दिग्विजय बागल यांच्यावर अपहाराचा गुन्हा  - Case filed against Digvijay Bagal, president of makai Sugar Factory | Politics Marathi News - Sarkarnama

बागल गटाच्या अडचणीत भर; दिग्विजय बागल यांच्यावर अपहाराचा गुन्हा 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

दिग्विजय बागल हे करमाळ्याच्या माजी आमदार श्‍यामलताई बागल यांचे चिरंजीव असून रश्‍मी बागल यांचे लहान भाऊ आहेत. 

पुणे : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्या विरोधात सोलापूरच्या सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मकाई कारखान्याने कामगारांच्या पगारातून 32 लाख 67 हजार 986 रुपयांची रक्कम कपात करूनही ती भविष्य निर्वाह खात्यात न भरल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिग्विजय बागल हे करमाळ्याच्या माजी आमदार श्‍यामलताई बागल यांचे चिरंजीव असून ते 2019 च्या करमाळा विधानसभा शिवसेनेच्या उमेदवार रश्‍मी बागल यांचे लहान भाऊ आहेत. 

करमाळा तालुक्‍यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना आणि श्री मकाई सहकारी साखर कारखाना या दोन्ही साखर कारखान्यावर बागल गटाची सत्ता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या निवडणुकीत दिग्विजय बागल यांच्या भगिनी रश्‍मी बागल यांचा पराभव झाला होता. या निकालानंतर बागल पुन्हा राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. 

गेल्या वर्षी आदिनाथ व मकाई दोन्ही कारखाना बंद होते. या वर्षी आदिनाथ हा भाडेतत्त्वावर देण्याचा बागल यांनी निर्णय घेतला आहे, तर मोठ्या प्रयत्नानंतर मकाई कारखाना सुरू करण्यात आला आहे. एकीकडे मकाई वाचविण्यासाठी आदिनाथ गहाण ठेवण्याचा आरोप बागल कुटुंबीयांवर होत असतानाच कामगाराच्या भविष्य निर्वाह निधीच्या रक्कमेत अपहार केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे. 

मकाई कारखान्याच्या कामगारांच्या साधारणपणे 24 महिन्याच्या पगारी थकल्या आहेत. त्यातच पीएफही जमा केला नसल्याचे उघड झाले आहे. 

भाविष्य निर्वाह निधीपोटी कामगारांच्या पगारातून रक्कम कपात करून ती न भरल्यामुळे भिलारवाडी (ता. करमाळा) येथील मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक हरिश्‍चंद्र खाटमोडे यांच्यावर सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत प्रतीक रामचंद्र लाखोले (रा. पोस्टल कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. 

मकाई कारखान्याने 2 जून 2018 ते 27 ऑगस्ट 2019 या कालावधीतील कामगारांच्या हिश्‍शाची भविष्य निर्वाह निधी रक्कम खात्यात जमा न करता अपहार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. अशा प्रकारची फिर्याद दिग्विजय बागल यांच्या विरोधात दाखल झाल्याने करमाळ्याच्या राजकारणात बागल गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख